लोक न्यूज
अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.,सुनील तटकरे आज दिनांक 3 जुलै रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून आज दुपारी 3 वाजता अमळनेरात ते दाखल होणार आहेत.त्यांच्या सोबत महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यासह एकूण 12 सेलच्या अध्यक्षांचीही उपस्थिती लाभणार आहे.
माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी ते भेट देणार असून यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात सत्कार समारंभ पार पडून कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत. अमळनेर येथून नंदुरबार जिल्ह्यात ते दाखल होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष येणार म्हणून आमदार अनिल पाटील यांनी स्वागताची जय्यत तयारी केली असून शहरात मान्यवरांच्या स्वागताचे फलक झळकू लागले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
तरी अमळनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते लोकप्रतिनिधी, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, माजी नगरसेवक यांनी आज दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.