लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून देखील ते हजर न झाल्याने घाईगडबडीत महिलेची अमळनेर आल्यावर प्रसूती झाली. रस्त्यात प्रसूती झाली असती तर बिकट प्रसंग ओढवला असता. पीडित महिलेच्या वडिलांच्या तक्रारींन्तर कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे.
      तालुक्यातील मांडळ येथे रक्षा विक्रांत कोळी हिला ११ रोजी रात्री साडे बारा वाजता प्रसूती वेदना जाणवू लागल्या होत्या. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी आणि जबाबदार कर्मचारी कोणीच नसल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी येण्यास नकार देऊन तुमचे पेशंट अमळनेर ला घेऊन जा असे सांगितले. अखेरीस रुग्णवाहिका घेऊन महिलेला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आणि लागलीच महिला प्रसूत झाली. याबाबत पीडित महिलेचे वडील रंजन झुलाल कोळी यांनी तालुका वैद्यकिय अधिकारी तसेच आरोग्य मंत्र्यांकडे मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की , यापूर्वी देखील अनेक घटना घडल्या असून मुडी येथील आदिवासी महिलेला प्रसूती दरम्यान जीव गमवावा लागला होता. तर  मांडळ येथील हिराबाई समाधान पारधी या महिलेला वेळेवर कोणत्याच सुविधा न मिळाल्याने तिला खाजगी वाहनात आणताना रस्त्यात प्रसूत होऊन तिला जीव गमवावा लागला होता. याबाबत नातलगांनी जाब विचारला असता डॉ प्रतीक्षा उर्फ पल्लवी पाटील यांनी महिलेच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली होती. त्यावेळी  त्यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्या अशाच चूका करीत आहेत. त्यांच्यावर शिस्तभंग ,कर्तव्यात कासुरीची कारवाई करून त्यांचा डॉक्टरकीचा परवाना रद्द करावा अन्यथा गावकरी टोकाचे पाऊल उचलतील असा इशाराही तक्रारीतून  देण्यात आला आहे. तक्रारीच्या प्रति जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा वैद्यकीय अधिकारी ,गटविकास अधिकारी , पंचायत समिती यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.
     मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. वारंवार तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात येईल- डॉ गिरिश गोसावी , तालुका वैद्यकीय अधिकारी ,अमळनेर