लोक न्यूज
अमळनेर:तालुक्यातील बहादरवाडी येथील लग्नातून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवल्याची घटना १० रोजी घडली असून याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० रोजी त्यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने ते लग्न कार्यात मग्न असताना फिर्यादीची १४ वर्ष १ महिना वय असलेली मुलगी व १५ वर्ष ८ महिने वय असलेली तिची मैत्रीण आम्ही नवरदेवजवळ पारावर जातो म्हणून बाहेर पडल्या. मात्र तीन वाजता लग्न लागल्यानंतर ही त्या दिसून आल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलींच्या आईवडिलांनी आजूबाजूच्या गावात व आपापल्या नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र कोणताही तपास न लागल्याने त्यांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अमळनेर पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.