लोक न्यूज
अमळनेर : महसूल विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे १३९.२६ टक्के महसूल कर वसूल केला आहे. गेल्या काही वर्षातील वसुलीचा हा उच्चांक आहे. वसुलीत अमळनेरचा जळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक आहे.
        प्रपत्र अ मध्ये जमीन महसूल ,बिन शेतीसारा आणि नजराणा आदि प्रकारच्या रकमेतून कर वसुली होत असते. तर प्रपत्र ब मध्ये गौण खनिज दंड , कर वसुली आदी प्रकारची वसुली होत असते.
     २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रपत्र अ मध्ये २.७० कोटी व प्रपत्र ब मध्ये ५.१८ कोटी असे एकूण ७.८८ कोटी रुपये वसूल करून ७०.०४ टक्के उद्दिष्ट साध्य केले होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रपत्र अ मध्ये १.६२ कोटी रुपये ,प्रपत्र ब मध्ये ३.९० कोटी रुपये असे एकूण ५.५२ कोटी रुपये वसूल करून ६७.७३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते. २०२३-२४ मध्ये  प्रपत्र अ मध्ये ३.७३ कोटी रुपये आणि प्रपत्र ब मध्ये ५.९८ कोटी रुपये  असे एकूण ९.७१ कोटी रुपये वसूल करून १०३.७४ टक्के उद्दिष्ट साध्य केले. मात्र २०२४-२५ या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली केली आहे. प्रपत्र अ मध्ये ३.५७ कोटी रुपये तर प्रपत्र ब मध्ये ९.५९ कोटी रुपये असे एकूण १३.७१ कोटी रुपये वसूल केले. चालू आर्थिक वर्षात १३९.२६ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे ,उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी ,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तसेच मंडळाधिकारी  ,तलाठी ,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
   बिन शेती साराचे सुमारे १५ कोटी थकबाकी*
       नागरिक  रिकामा  प्लॉट घेऊन ठेवतात. त्यांनंतर तेथे काही वर्षांनी घर बांधले जाते. प्लॉट चे रूपांतर घरात झाल्याने ते सिटी सर्व्हे कडे वर्ग होते. नागरिक महसूल कर भरणे बंद करतात. प्रत्यक्षात मात्र सिटी सर्व्हे विभागाने असेसमेंट करून बिन शेतीसारा प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवायला पाहिजे. तेथून नागरिकांकडे बिनशेतीसारा यादी तलाठी कडे येते आणि तलाठी तो वसूल करतात. मात्र  गेल्या १५ वर्षांपासून ही प्रक्रिया राबवलीच गेली नसल्याने नागरिकाना याबाबत काहीच माहिती नाही.  असा बिनशेतीसारा म्हणून सुमारे १५ कोटी रुपये अंदाजित थकबाकी नागरिकांकडे असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.