लोक न्यूज
प्रतिभेच्या ओंजळीत शब्दांचं पाणी,त्या प्रत्येक थेंबात जनतेची कहाणी! जिच्या लेखणीला व्यथा उमगते,तिच्या कविता समाजाचं मन वाचते!ती पाहते अश्रूंना, फुलांतून सांडलेले,भुकेल्या नजरेत स्वप्न उगमलेले!निसर्ग, शोषण, स्त्रीचं दुःख, वीरांचं बलिदान,
साऱ्या छटांना ती देते शब्दरूप प्राण! ती आरसा असते, पण तुटलेला नाही,दिसतं त्यात सत्य, पण उभं राहतं काही!कधी तिचा शब्द वणवा पेटवतो,कधी तो शिडकाव शांततेचा होतो!प्रसन्न भावनांच्या सोज्वळ रेशमी साखळ्यांमध्ये मानवी संवेदनांचा सुगंध भरून, शब्दांमध्ये जीव ओतणारी कवयित्री म्हणजे प्रतिभा सुरेश खैरनार यांचा "वंशावळीच्या प्राचीन सरीतून" कवितासंग्रहाचा अभूतपूर्व प्रकाशन सोहळा थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या सुकन्या ममताताई सकपाळ यांच्या शुभहस्ते गुरूवार दि. १० एप्रिल २०२५ रोजी मांजरी येथील सन्मती बाल निकेतन येथे संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. संदीप सांगळे, लेखक संदीप राक्षे, पवना सहकारी बँकेचे संचालक दादू डोळस, नंदकुमार पवार, किरण पवार, अविनाश पवार, योगेश पवार, नैनिता पवार, मनिषा पवार हे उपस्थित होते. अत्यंत पवित्र, प्रेरणादायी आणि भावनांनी ओथंबलेला असा हा प्रकाशन सोहळ्याचा क्षण होता…
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा,समाजसेवेची तेजस्वी जीवनज्योत सिंधूताई सपकाळ यांचे वास्तव्य लाभलेल्या पावन स्थळी होण हा महायोगच. केवळ एक साहित्यिक सोहळा नव्हे, तर संवेदनेच्या आणि सेवेच्या संगमाचं जणू एक दिव्य पर्व होतं. कै. सिंधूताई सपकाळ यांच्याच्या आठवणींच्या पायघड्या रेखत जिथे एकेकाळी आईसारख्या मायेची सावली होती, जिथे अश्रूंना आधार होता आणि उपेक्षितांना घरकुल होत, त्या पवित्र व दिव्य वास्तूत काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत असताना सिंधूताईंच्या कार्याला श्रद्धांजली ठरावी, अशी प्रतिभा खैरनार यांची भावनांनी ओतप्रोत भरलेली कवितासृष्टी त्या वास्तूत प्रकाशित झाली होती. या प्रकाशन सोहळ्याचा प्रत्येक क्षण म्हणजे मायेसाठी वाहिलेलं एक काव्य होतं.प्रतिभा खैरनार यांच्या शब्दांत जणू सिंधूताईंच्या आठवणींचा एक मूक संवाद सुरू होता. त्यांच्या लेखणीतून उमटणाऱ्या भावना,त्या वास्तूतल्या भिंतींनी जणू हळुवारपणे अलगद उराशी घेतल्या होत्या. शब्द आणि सेवा यांचा अद्वितीय संगम पहावयास मिळत होता. हा प्रकाशन सोहळा केवळ एका कवितासंग्रहाचा आरंभ नव्हता, तो होता सेवेच्या आणि सृजनाच्या व्रताचा नवा दिवा पेटण्याचा क्षण.  प्रतिभा खैरनार: साहित्यातील आगळंवेगळ रसायन.प्रतिभा खैरनार यांचा कवितासंग्रह हातात पडल्यावर नजरेत भरली ती एका एका ओवीतील प्रस्तावना आणि मनोगत,   एका ओवीत जीवनपट, माहितीपट सांगण हे कठीण काम अगदी सहज केलेलं दिसत. हे खरच केवळ औपचारिक लेखन नसून, ती एक आत्म्याची साक्ष आहे. जिथे शब्दांनी स्त्रीमनाच्या खोल भावनांना, समाजाच्या उपेक्षित कोपऱ्यांतून उगम पावलेल्या अनुभवांना आणि बाईपणाच्या नाजूक, पण ठाम अस्तित्वाला शब्दरूप दिले आहे. मनोगतः घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर..मनोगत हा भाग म्हणजे कवयित्रीच्या अंतर्मनाचा एक आर्त स्वर आहे जिथे ओटीपोटाभरच्या कोरीव लेण्यांमध्ये घुमणारे घरंदाज हुंदके आपल्याला ऐकू येतात. या मनोगतातून, कवयित्रीच्या व्यक्तिगत अनुभवांची, तिच्या भावनांची आणि तिच्या संवेदनशीलतेची एक झलक आपल्याला मिळते. ते मनोगत केवळ एक लेखन नाही, तर एक आत्म्याची साक्ष आहे.
प्रस्तावनाः बाईपणाच्या हिरव्या गर्भाची पेरणी..या कवितासंग्रहाची प्रस्तावना म्हणजे पुरुषी माळरानावर बाईपणाचा हिरवा गर्भ पेरणारी एक सर्जनशील प्रक्रिया आहे. ती प्रस्तावना केवळ परिचय नाही, तर एक साक्षात्कार आहे. जिथे बाईपणाच्या अनुभवांची, वेदनांची आणि आशांच्या बीजांची पेरणी केली जाते. या प्रस्तावनेतून, स्त्रीच्या अस्तित्वाची, तिच्या संघर्षांची आणि तिच्या स्वप्नांची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. प्रतिभा खैरनार यांचा वंशावळीच्या प्राचीन सरीतून हा कवितासंग्रह केवळ एक साहित्यिक कृती नाही, तर तो एक सामाजिक आणि भावनिक दस्तऐवज आहे जिथे स्त्रीच्या अस्तित्वाची, तिच्या अनुभवांची आणि तिच्या स्वप्नांची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. या संग्रहाच्या माध्यमातून, कवयित्रीने स्त्रीच्या अंतरंगातील भावनांना, तिच्या संघर्षांना आणि तिच्या आशांना एक सशक्त आवाज दिला आहे. प्रकाशनाच्या या मंगल दिवशी, प्रतिभा खैरनार यांच्या शब्दसृष्टीला आमचा साष्टांग नमस्कार!कविता म्हणजे आत्म्याची भाषा असते हे  प्रतिभा खैरनार यांनी समजावून दिलं,आणि त्या भाषेचं एक शुद्ध, सोज्वळ रूप म्हणजे प्रतिभा खैरनारचं लेखनशास्त्र. वंशावळीच्या प्राचीन सरीतून काव्यसंग्रहास मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!संदीप राक्षे
भोसरी पुणे२६