लोक न्यूज-
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल हा समाज मनाचे परीक्षण करावयास भाग पाडणारा आहे. गोऱ्या व अन्यायी वृत्तीच्या विदेशी इंग्रजांनी तसेच क्रूर व दहशती वृत्तीच्या मोगलांनी राज्य करून महाराष्ट्रातील भोळ्या व अज्ञानी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असे काही ऐतिहासिक दाखले देत जाहीरपणे मंचावरून मांडले जाते. गोऱ्या व अन्यायी इंग्रजांचा तसेच क्रूर व दहशती वृत्तीच्या मोगलांचा अन्याय शेतकऱ्यांना हतबलतेपाई सक्तीने सहन करावयास भाग पाडले जात होते अशी देखील मांडणी सर्रास मंचावरून केली जाते. परंतु आजरोजी गोऱ्या व अन्यायी इंग्रजांचा तसेच क्रूर व दहशती वृत्तीच्या मोगलांचा महाराष्ट्रात रहिवास नसतांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय नेमका कोण करतोय ? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते ? या बाबींचा शोध घेतला असता शेतकऱ्यांनीच विचार तत्व व स्वाभिमान या त्रिसूत्रीचा चक्क बाजार मांडलेला दिसून येत आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असा उदो-उदो करणाऱ्या मावळारूपी शेतकरी मतदारांनी व स्वतःस छत्रपती शिवरायांचा सैनिक असे म्हणवत मिरवून घेणाऱ्या उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी निगडित असलेल्या लोकसभा, विधानसभा, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा विविध निवडणुकींच्या प्रसंगी सन्मान व स्वाभिमान ही तत्व पायदळी तुडविल्याचे दिसून येत आहे.

लोकशाही समाज व्यवस्थेत लोकांच्या माध्यमातून निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत राज्य कारभार चालवला जातो. परंतु राज्य कारभार चालवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून देणारे शेतकरी वर्गवारीतील मतदारच जर स्वतःचा मान सन्मान व स्वाभिमान अर्थात नीतिमत्ता भांडवलदार वर्गवारीतील भांडवलदाराकडून रोख रक्कम घेऊन गहाण ठेवत भांडवलदारांनाच आपला प्रतिनिधी म्हणून पाठवत असतील तर अशा भांडवलदार वर्गवारीतील प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांचा मान, सन्मान व स्वाभिमान अबाधित ठेवत शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करणे म्हणजे वांझोट्या महिले कडून अपत्य प्राप्तीची अपेक्षा करण्यासारखे आहे. सन्मान व स्वाभिमान गहाण ठेवून शेतकरी मतदारांनी मताधिकाराचा वापर करत दिलेली सत्ता तसेच तत्त्व व नीतिमत्ता गहाण ठेवून शेतकरी मतदारांचा मताधिकार विकत घेऊन उमेदवारांनी घेतलेली सत्ता या खेळातील सत्ता लोकशाहीचा निव्वळ देखावाच नव्हेतर मतदार व उमेदवार या दोघांच्या दृष्टीने मी नाही त्यातली व कडी लावा आतली ' अश्या वृत्तीचे द्रोतक आहे. मतदार या नात्याने मी माझा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही व उमेदवार या नात्याने वाम मार्गाचा आधार घेऊन अर्थात मतदारास पैसा देऊन मताधिकार खरेदी करून निवडून येणार नाही अशी कटिबद्धता जोपर्यंत मतदार व उमेदवार या दोघांच्या मनात व बुद्धीत विकसित होत नाही तोपर्यंत बहुजनभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही या समाजात प्रस्थापित होणार नाही.

आपला मान, सन्मान व स्वाभिमान अभाधित ठेवणारी शोषणमुक्त समाज व्यवस्था निर्मितीसाठी आपला प्रतिनिधी निवडून देण्याची वेळ येते तेव्हा शेतकरी मतदार हा स्वतःचा मान, सन्मान व स्वाभिमान विकण्यासाठी आतुर झालेला असतो तर शेतकरी मतदाराचा मान, सन्मान व स्वाभिमान खरेदी करणेसाठी समाज शोषक वृत्तीचा उमेदवार सज्ज झालेला असतो. मग ती निवडणूक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती अशी कोणतीही असो. . भारतीय संविधानाच्या माध्यमातून मताधिकारारूपी आपला मान सन्मान व स्वाभिमान आपण गहाण ठेवू नका अशी मांडणी मतदारांच्या स्तरावरून व उमेदवार या नात्याने मी देखील मतदारांचा मान सन्मान व स्वाभिमान गहाण ठेऊ नये. वाम मार्गाने निवडून येण्यात धन्यता मानणार नाही अशी मांडणी उमेदवारांच्या स्तरावरून होतांना कुठेही दिसून येत नाही. परिणामी निवडणुकीच्या निकालाअंतीच्या विजय उत्सवात विकाऊ व स्वाभिमानशून्य मतदार तसेच वाम मार्गाचा आधार घेऊन निवडून आलेले नीतिमत्ताहीन उमेदवार त्याचप्रमाणे या व्यवस्थेतील कार्यरत दलाल या व्यतिरिक्त समाजातील अन्य कोणताही घटक सहभागी होतांना दिसून येत नाही. निवडून आलेला नव्हेतर निवडून घेतलेला उमेदवार तसेच मताधिकाराच्या माध्यमातून उमेदवार निवडून देणारा नव्हेतर मताधिकारारूपी अधिकार गहाण ठेवून स्वतःची इज्जत गहाण ठेवून प्रतिनिधी निवडून देणारा मतदार असे दोन्ही घटक निवडणुकीच्या निकालानंतर उजळ माथ्याने चारचौघात जाहीर मंचावरून आपल्या छातीवर हात ठेवत आम्ही स्वाभिमान व नैतिक अधिष्ठानावर जगणारे भारतीय नागरिक आहोत असे बोलू शकत नाहीत.

संविधानिक तरतुदींन्वये गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य हे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निवडून देतात. गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य हे प्रतिष्ठित वर्गवारीतील नागरिक असतात. परिणामी अश्या प्रतिष्ठित वर्गवारीतील नागरिकांच्या माध्यमातून तालुकास्तरीय कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिताचा खऱ्या अर्थाने विचार करणारे पात्र व योग्य असेच प्रतिनिधी निवडून येतील व तालुकास्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांचे शोषण थांबेल अशी संविधानिक तरतुदींची मांडणी करणाऱ्या संविधान निर्मात्यास अभिप्रेत होते. परंतु आज रोजीच्या समाज मनाचे अवलोकन केले असता बहुसंख्य ठिकाणी अपवाद वगळता बाजार समितीचे संचालक निवडून देणारे गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या मताधिकाराचा जाहीरपणे बाजार मांडणारे दिसून आलेत. बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराकडे आपला मताधिकार गहाण ठेवण्यासाठी गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य हे स्वतःच धडपडत होते. सोसायटी मतदार संघात मतदार असलेल्या अपवाद वगळता काही महाभागांनी तर आपल्या कुटुंबातील आई बहीण पत्नी मुलगी सून अश्या महिला वर्गवारीतील सदस्यांसाठी मी साधी एखादी पैठणी विकत घेऊ शकत नाही एवढा मी आर्थिक हतबल आहे ही बाब मनोमन मान्य करून घेत बाजार समितीची निवडणूक लढवणारा एखादा उमेदवार माझ्या घरातील महिला सदस्यांसाठी मला एखादी पैठणी आणून देईल काय ? या आशेने त्यांनी आपल्या घराचे दरवाजे रात्री १२:०० वाजेच्या सुमारास उघडलेत. म्हणजेच आर्थिक हातबलतेपाई बाजार समितीचा संचालक निवडून देणेसाठी संविधानिक तरतुदींन्वये मला मिळालेला केवळ मताधिकार गहाण ठेवणे नव्हेतर पैशांसाठी वाटेल ती तडजोड जनाची नव्हेतर मनाची देखील थोडीफार लाज व खंत न वाटू देता करावयास मी निसंकोचपणे तयार आहे असा संकेतच गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक म्हणवून घेणाऱ्या प्रतिष्ठितांनी भांडवलदार वर्गवारीतील उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना देवून संविधान निर्माताच्या अपेक्षेवर पाणी फिरविले आहे असे खेदाने व जड अंतकरणाने या ठिकाणी नमूद करणे भाग होत आहे. परिणामी अशा वृत्तीच्या गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांचे स्तरावरून मताधिकाराचा वापर करत तालुकास्तरीय कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांचे शोषण थांबविणारे संचालक निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करणे ही बाब कितपत योग्य आहे ? सदर बाब मी नैराश्यतेपोटी नमूद करीत नसून वास्तवतेस अनुसरून संविधानिक तरतुदींचे रक्षण करण्यासाठी धडपडणाऱ्या अभ्यासू वर्गवारीतील वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहे.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वजनात सुमारे ३५ वर्षापासून प्रतिक्विंटल बेकायदेशीरपणे सर्रास एक किलो कट्टीच्या माध्यमातून करण्यात येणारी लूट थांबविण्यासाठी उभ्या आयुष्यात ज्यांनी स्वतः अथवा ज्यांच्या पूर्वजांनी साधा पत्रव्यवहार अथवा कोणतेही आंदोलन केलेले नाही, प्लेट काट्यावरील शेतमालाची मोजणी फी शेतकऱ्याने स्वतः भरलेली असतांना हिशोबपटीत पुनश्च तोलाईच्या रकमेची आकारणी करत शेतकऱ्यांची सर्रास केली जाणारी लूट थांबविण्यासाठी जो कधी पत्रव्यवहार अथवा प्रयत्न करतांना दिसून येत नाही, बाजार समितीतील शेतमालाच्या लिलावांती शेतमाल व्यापाऱ्यांच्या गोडाऊन पर्यंत विनामूल्य पोहचून देणे शेतकऱ्यांना सक्तीने भाग पाडणेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना होणारी मानसिक त्रस्तता ज्यांच्या लक्षात येत नाही, कापूस या शेतमालाचा भुसार माला प्रमाणे खुल्या पद्धतीने बोली बोलून जाहीर लिलाव न केला जाणे तसेच कापूस हा शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यास अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाची परिशिष्ट १९ अन्वयेची हिशोबपट्टी न देता सट्टाच्या आकड्याप्रमाणे आकडेवारी नमूद असलेली हिशोब पट्टी देऊन शेतकऱ्यांची सर्रास लूट नेमकी कशी केली जाते ? हे ज्यांना समजत नाही किंबहुना या बाबीकडे जे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असे उमेदवार निवडून येणे व या प्रश्नांना केंद्रबिंदू करत सदरील प्रश्न एप्रिल २०२४ पावेतो कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावत शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका लिखित स्वरूपात नमूद करणाऱ्या शेतकरी शोषणमुक्ती पॅनल मधील उमेदवारांना अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देणे तर सोडा परंतु त्यांचे अनामत रक्कम देखील जप्त करावयास भाग पाडणे या बाबीवरून शेतकरी शोषण मुक्ती पॅनलचा पॅनल प्रमुख या नात्याने विजयी उमेदवारांना शुभेच्छा व पराजितांना सदिच्छा देत माझ्या लेखणीस तात्पुरता पूर्णविराम देतो.

सत्यशोधक विश्वासराव पाटील, अध्यक्ष गावरानी जागल्या सेना तथा शेतकरी शोषणमुक्ती पॅनल प्रमुख.