उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप निरीक्ष रविंद्र बाबुराव पाटील यांची       पोलीस उप आयुक्त यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.अशीच कामगिरी आपण भविष्यात कराल याकरीता आपणांस शुभेच्छा!



लोक न्यूज- मुंबई
भिवंडी शहरात २६ डिसेंबर रोजी कामतघर परिसरातून अपहरण झालेल्या दीडवर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. महिनाभरानंतर चिमुरडा आईवडिलांच्या कुशीत विसवल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, विक्री करण्यासाठी चिमुरड्याची चोरी करणाऱ्या एक व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

शहर पोलीस ठाणे हद्दीतील हनुमाननगर, कामतघर येथील सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धुवत असताना त्यांचा दीडवर्षीय मुलगा घराबाहेर खेळत असताना सिद्धांतचे अपहरण झाले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहायक पोलीस आयुक्त सुनील खडके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि रवींद्र पाटील, पी. हवा खाडे, राणे, भोसले, पवार,कोदे, नंदिवाले, हरणे, गावित असे पथक तयार करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास करताना जंगजंग पछाडले. पोलीस पथकाने नेपाल सीमेपर्यंत आपला तपास करीत शोधमोहीम घेतली असता एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करीत संशयित गणेश नरसय्या मेमुल्ला वय ३८, रा. भाग्यनगर, कामतघर यास ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मूल चोरी करून १ लाख ५ हजार रुपयांना विक्री केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलीस पथकाने पद्यानगर नवजीवन कॉलनी या परिसरात राहणाऱ्या भारती सुशील शाहू (वय ४१) व आशा संतोष शाहू (वय ४२) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून चिमुरड्याची सुखरूप सुटका केल्यानंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्यास आईवडिलांच्या हाती सुखरूप स्वाधीन केले. या तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.




भारती सुशील शाहू व आशा संतोष शाहू या दोघी बहिणी असून आशा हिस मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला. तो तिने बहीण भरतीला बोलून दाखवला. भारतीची ओळख गणेश नरसय्या मेमुल्ला या सोबत असल्याने त्यांनी हा कट रचून मूल चोरी करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गणेश मेमुल्ला याने हनुमाननगर परिसरात टेहळणी करून लहान मूल हेरले. त्यामध्ये सिद्धांत हा त्याच्या नजरेत आला व त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.