अमळनेर- लोक न्युज    
  
अमळनेर तालुका धनगर समाज व युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच उपविभागीय अधिकारी माननीय सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने माननीय योगेश पवार साहेब यांनी निवेदन स्वीकारले. दरवर्षी शासकीय भरतीत धनगर समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो कारण एन टी क या प्रवर्गात योग्य त्या प्रमाणात आरक्षण निहाय जागा मिळत नाही त्यामुळे या समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
       महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी अनेक रिक्त जागा भरण्यात येतात. त्यानुसार राज्य शासन ते पदे भरणे बाबत सकारात्मक असल्याने धनगर समाजाने हे निवेदन दिले. मागील काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध झालेल्या अनेक जाहिरातींचे अवलोकन केल्यास असे निदर्शनास आले आहे की धनगर समाजाला संवर्गीय आरक्षणानुसार  (NT-C 3.5%) रिक्त जागा भरण्यात येत नाही किंबहुना त्या प्रमाणात जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होत नाही. त्यामुळे समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागातील उपसमितीने परवानगी दिलेल्या व उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी जारी केलेला शासनादेशात धनगर समाजाला आरक्षणानुसार पदे मिळावीत अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
     तरी सदर रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागाने बिंदु नामावली तयार करून धनगर समाजाला राज्य शासनाने दिलेल्या जागा नुसार भरती करण्यात यावी व धनगर समाजावरील अन्याय दूर करावा. कारण प्रत्येक 100 रिक्त जागा असतील तर एन टी क चे तीन ते चार उमेदवार असले पाहिजे. परंतु तसे होत नाही.  नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पीएसआय भरती बाबत सहाशे पन्नास जागा मागे एन टी क साठी फक्त दोन जागा आहेत. तरी आगामी काळात असे होऊ नये यासाठी धनगर समाजाची विनंती आहे. जर संवर्गीय आरक्षण पाळले गेले नाही तर धनगर समाजाचे उमेदवार आगामी काळामध्ये मोठा उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही असे निवेदनात नमूद आहे.
 निवेदनावर आरक्षण संघर्ष समितीचे डी ए धनगर, युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष देवा लांडगे, अध्यक्ष आलेश धनगर, चेअरमन दशरथ लांडगे, न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम चे चेअरमन निलेश लांडगे, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, अनिल धनगर, निखिल धनगर, सुधाकर पवार, गुलाबराव भागवत, रमेश धनगर, शशिकांत आढावे, ऋषिकेश सुलताने, नामदेव ठाकरे, स्वप्निल ठाकरे आदी समाज बांधवांच्या सह्या आहेत.