लोक न्यूज-
राज्यात एकीकडे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असतांना, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा हळूहळू का होईना पूर्वपदावर येत असतांना अजून पगार न झाल्याने 90 हजार पेक्षा जास्त एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. दर महिन्याच्या 7 तारखेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. मात्र गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार हा उशिरा झाला होता. मात्र आता या महिन्याची 11 तारीख उलटली असतांनाही पगार होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यानं ‘महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना’ ही मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटना मुंबईतील औद्योगिक न्यायालयात दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.
सध्या एसटी सेवा नेहमीप्रमाणे धावत नसून 10 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार 10 हजार 224 एसटीच्या फेऱ्यांच्या माध्यमातून 20 लाख 59 हजार प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. यामधून एसटीला 9 लाख 97 हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले. करोना काळ सुरू होण्याच्या आधी एसटीला दररोज सरासरी एक लाख फेऱ्यांच्या माध्यमातून 24 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळायचे, दररोज 65 लाख प्रवासी प्रवास करायचे.
करोना काळांत सुरुवातीला एसटी सेवा सर्वसामान्य लोकांकरता पूर्णपणे बंद होती, त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला होता. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांबरोबर झालेले वेतनकरार, कमी होणारी प्रवासी संख्या यामुळे एसटी महामंडळाचे पेकाट पार मोडले आहे. त्यातच अनेक प्रकारच्या अनुदानांचा परतावा सरकारकडून थकला आहे. या सर्व परिस्थितीमुळे एसटी महामंडळावर कर्जाचा बोझा दिवसेंदिवस वाढत असून आता हा आकडा आता सहा हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे.
या सर्व परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांचा पगार देणे एसटी महामंडळला दिवसेंदिवस अशक्य होतं आहे. गेल्या वर्षी दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नव्हता, राज्य सरकारने एक हजार कोटींची तात्काळ मदत केल्याने ते प्रकरण मार्गी लागले होते. तेव्हा सध्याच्या परिस्थितीत सरलेल्या कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न एसटी महामंडळापुढे आहे. 90 हजारपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अजून झालेला नाही.