लोक न्यूज
अमळनेर – येथील तालुका ठाकूर समाज सेवा संघाची महत्त्वपूर्ण बैठक शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (उर्फ जितू ठाकूर) यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली. बैठकीत बहुसंख्य ठाकूर बांधवांची उपस्थिती होती.
बैठकीत जितेंद्र ठाकूर हेच ठाकूर समाजाचे अधिकृत उमेदवार म्हणून एकमुखी निर्णय घेण्यात आला. आमदार अनिल पाटील यांनी ठाकूर समाजाला न्याय दिल्याचे नमूद करत, त्यांच्या निवडीचा आदर ठेवत संपूर्ण ठाकूर समाजाने एकच उमेदवार म्हणून जितू ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, आगामी निवडणुकीत त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे ठरवण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत रणजीत शिंदे, चेतन ठाकूर आणि गुणवंत वाघ यांची माघार
ठाकूर समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते व अर्बन बँकेचे माजी व्हाइस चेअरमन रणजीत शिंदे, तसेच गुणवंत वाघ व चेतन ठाकूर यांनी सामाजिक जाणिवेतून निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी जितेंद्र ठाकूर यांना जाहीर पाठिंबा देत संपूर्ण समाजाने एकदिलाने उभे राहावे, असे आवाहनही केले.
या बैठकीला तालुका ठाकूर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप धोंडू ठाकूर, ठाकूर समाज सेवा मंडळाचे महाराष्ट्र सरचिटणीस रणजित शिंदे, तसेच इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने ठाकूर बांधव उपस्थित होते.