लोक न्यूज
अमळनेर नगरपालिका निवडणूक संपताच आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा लवकरच होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीच्या शक्यतेनेच अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात विविध इच्छुकांनी पोस्टर-बॅनर आणि सोशल मीडियावर ‘चमकोगिरी’ सुरू केली आहे.
जनतेच्या मते, गेल्या पाच वर्षांत या इच्छुकांनी ग्रामीण भागात विकासासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. स्थानिक समस्या सोडविण्यातही त्यांचा सहभाग दिसला नाही. अशा परिस्थितीत फक्त पदासाठी बॅनरबाजी करून स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामीण भागात विशेषतः चार-चार पक्ष बदलणारे काही चेहरे अचानक पुन्हा समोर येत आहेत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची माहिती जनतेलाही समजत नाही, इतक्या वेगाने राजकीय निष्ठा बदलल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. “अशा लोकांना योग्य जागा दाखवली नाही, तर ते पुन्हा दिशाभूल करतील,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होते.
ग्रामीण जनतेचे मत असे की, आजी-माजी आमदार-खासदारांनी प्रत्यक्ष सर्वे करूनच उमेदवारांना तिकीट द्यावे. जनतेचा कौल न घेता नेमके कोणाला उमेदवारी दिली जाते हे अनेकदा अस्पष्ट राहते, त्यामुळे या वेळी तिकीटवाटप पूर्ण पारदर्शकतेने व्हावे, अशी मागणी व्याप्त झाली आहे.
निवडणुकीची अधिसूचना येण्याची प्रतीक्षा असतानाच ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, येत्या काही दिवसांत या निवडणुकांबाबत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.