लोक न्यूज
अमळनेर, दि. २४ ऑगस्ट २०२६ : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच समाजाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. समाजातील मुली इतर समाजामध्ये लग्नासाठी देणे अथवा विक्री केल्याच्या प्रकरणांबाबत संबंधित कुटुंबांशी सामाजिक संबंध ठेवला जाणार नाही, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. तसेच अशा कुटुंबांना ज्या समाजामध्ये त्यांनी मुलगी दिली आहे, त्या समाजातच समाविष्ट करण्यात यावे आणि आदिवासी समाजातून त्यांचा बहिष्कार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, नाशिक येथे आपल्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनाद्वारे प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.
या वेळी एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. गुलाब बोरसे, एकलव्य संघटनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष श्री. भैय्या सोनवणे, अमळनेर तालुका रावण ग्रुपचे अध्यक्ष श्री. नरेश चव्हाण, श्री. अजय भाऊ, श्री. सागर भाऊ, एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री. आबा बहिरम, अमळनेर तालुक्यातील वरिष्ठ कार्यकर्ते श्री. धनराज मालचे, ढेकू गावातील वरिष्ठ कार्यकर्ते श्री. रावसाहेब पवार, एकलव्य संघटनेचे जिल्हा सल्लागार श्री. विनायक सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. खैरनार दादा, पारधी समाजाचे कार्यकर्ते श्री. भुरा पारधी, श्री. नितीन भाऊ, श्री. राहुल भाऊ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने चर्चा करून योग्य तोडगा काढावा, अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.