लोक न्यूज
अमळनेर : “अमळनेर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील पाणी, उद्योग आणि आरोग्याचे प्रश्न मला माहीत आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी मी जीव ओवाळून टाकेन,” असे भावपूर्ण उद्गार डॉ. दिगंबर (राजू) महाले यांनी काढले.
व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने अमळनेर येथे डॉ. महाले यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिशा संदानशिव, उषा देवरे आणि डी. ए. पाटील यांनी महात्मा फुले यांचे गीत सादर केले. यावेळी मराठा सेवा संघाचे अशोक पाटील, बहुजन समाज पार्टीचे गौतम मोरे, अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे रियाज मौलाना, धनदाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, राष्ट्रीय कला मंचचे अजय भामरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन आणि युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी डॉ. दिगंबर महाले यांच्या पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.
विचारपीठावर महिला पतंजली योग समितीच्या माधुरी पाटील तसेच पुरोगामी क्रांती दल, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. डी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर बापुराव ठाकरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, अॅड. तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शिक्षक नेते योगेश पाटील, सुनील अहिरराव, डॉ. कुणाल पवार, ठेंग मॅडम, वाल्मीक मराठे, दिलीप बहिरम, संजय पाटील, अॅड. रज्जाक शेख, उमेश काटे, जयेश काटे, शंकर बैसाणे, देवेंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.