लोक न्यूज
अमळनेर:-शहरात दिनांक 31 जुलै रोजी अतिवृष्टी व बोरी नदीस आलेल्या महापुरामुळे वाहून गेलेली शहर पाणीपुरवठा योजनेची पुन्हा टाकण्यासाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी पालिकेला प्राप्त झाल्याने आमदार अनिल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
       बोरी नदी पात्रात पुलाखाली असलेली ही मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होऊन शहरवासीयांवर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते.सदर कामासाठी मोठा निधी लागणार असताना पालिकेची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने नुकसानीच्या पाहणीसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील अमळनेर येथे आले असता आमदार अनिल पाटील यांनी ही व्यथा मंत्र्यांकडे मांडून डीपीडिसीतुन निधी उपलब्ध करून घ्यावा अशी विनंती केली होती यावर दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्याने पालिकेच्या वतीने खाजगी ठेकेदाराकडून तातडीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले.या कामाला तब्बल 22 दिवसांचा अवधी लागला दिनांक 22 ऑगस्ट ला काम पूर्ण झाल्याने सदर पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित होऊन जलकुंभ भरले गेले आणि लोकांना मोठ्या प्रतीक्षेनंतर नळाला पाणी मिळाले.
       सदर काम पूर्ण होताच सदर कामासाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी पालिकेकडे सुपूर्द केला असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांना भ्रमणध्वनी वरून दिल्याने त्यांनी गुलाबराव पाटील व गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयांचे अमळनेरकर जनतेच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.