अमळनेर | लोक न्यूज:

अमळनेर येथील डी. आर. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा सुरेंद्र सूर्यवंशी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्वाची दखल घेत 'आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार–2026' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या वतीने धुळे येथील कांकरिया भवन येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
राज्यभरातील शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, राजकारण तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. त्यामध्ये सौ. सीमा सूर्यवंशी यांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचा गौरव मानली जात आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) राजकुमार उपासे, डीवायएसपी वासुदेव देसले, महिला परिषद अध्यक्षा सुषमा देसले, सुप्रसिद्ध शिवप्रभू वक्ते सचिन देवरे, फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक एस. पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट पटेल, महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रफुल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सौ. सीमा सूर्यवंशी यांनी मुख्याध्यापिका म्हणून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाची जोपासना करणे, विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे आणि शाळेच्या प्रगतीसाठी प्रभावी नेतृत्व देणे या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. सीमा सूर्यवंशी यांचा झालेला हा राज्यस्तरीय गौरव अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.