लोक न्यूज
अमळनेर:-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेरच्या संघटनात्मक बांधणीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये प्रणव चौधरी यांची तालुकाध्यक्षपदी, मनीष पाटील यांची शहराध्यक्षपदी तर हूजैफा पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
          राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांवर पक्षाने विश्वास व्यक्त करत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.
        मागील काही वर्षांपासून हे तिन्ही पदाधिकारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व विविध समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याची, विद्यार्थ्यांमधील संपर्काची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आगामी काळात विद्यार्थी संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्य करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
         याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चैतन्य संदानशिव, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, सोशल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, विद्यार्थी सहसचिव चेतन बोरसे तसेच योगेश पाटील, प्रीत शाह यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.