लोक न्यूज
आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या १६ दिवसीय ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. महिलांनी कौशल्याच्या जोरावर आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून आत्मनिर्भरतेकडे विश्वासाने पाऊल टाकावे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या जयश्री अनिल पाटील यांनी यावेळी केले.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश महिलांना ब्लाऊज, ड्रेस आदी वस्त्रांवर आकर्षक आरी वर्कची कला आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. प्रशिक्षणात ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना बेसिकपासून ॲडव्हान्स स्तरापर्यंत विविध प्रकारचे आरी वर्क, आधुनिक डिझाइन्स तसेच व्यावसायिक पद्धतीने काम करण्याचे सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
सांगता समारंभात सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जयश्री अनिल पाटील, कांचन शहा, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. जयश्री अनिल पाटील यांनी अशा प्रकारच्या कौशल्यविकास प्रशिक्षणांमुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असून महिलांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले.
प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी सहभागी महिलांना बेसिक ते ॲडव्हान्स आरी वर्कचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद यांनी महिलांनी तयार केलेल्या आरी वर्कच्या आकर्षक नमुन्यांची पाहणी करून त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जिता शिसोदे तसेच संस्थेचे कार्यकर्ते भावेश मराठे यांनी विशेष सहकार्य केले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारे असे कौशल्यविकास उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडविणारे ठरत असून, भविष्यातही अशा प्रशिक्षणांद्वारे अधिकाधिक महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.