लोक न्यूज
वैजापूर (ता. १४) : देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर प्रत्येक नागरिकाने समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि समाजभान जपत कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच भारत भविष्यात जगातील सक्षम, सुदृढ, उन्नतशील आणि प्रगतिशील राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य गोपालजी आर्य (जोधपूर, राजस्थान) यांनी केले.
रविवार (ता. १२) रोजी पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात आयोजित “प्रमुख नागरिक संगोष्ठी” या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन वैजापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
गोपालजी आर्य पुढे म्हणाले की, राष्ट्र उभारणीसाठी संघाने मांडलेली पंचतत्वे अत्यंत महत्त्वाची आहेत. यात कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वयं बोध (स्वतःची विधायक ओळख) आणि नागरिक कर्तव्य पालन या तत्वांचा समावेश आहे. या पंचतत्वांचे प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने पालन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने या मूल्यांचा अंगीकार केल्यास समाज अधिक सशक्त होईल आणि राष्ट्राच्या प्रगतीला गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगातील सुमारे ६५ देशांमध्येही विविध माध्यमांतून सुरू आहे. समाजातील जबाबदार घटकांपर्यंत संघाचे उद्दिष्ट आणि कार्य पोहोचवून समाज जागृत करणे आणि देशाचे भविष्य उज्ज्वल बनवणे हा या कार्यामागील प्रमुख हेतू आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत, उपप्राचार्य डॉ. परदेशी, अशोक पवार खंडाळकर, वाल्मिक जाधव, सुभाष गायकवाड तसेच प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, शहर व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाल्मिक जाधव यांनी केले. त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत या संगोष्ठीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.