लोक न्यूज

अमळनेर : खान्देशी संस्कृतीची शान मानली जाणारी ‘आखाजी’ यंदा अमळनेर नगरीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. खान्देश साहित्य संघाच्या वतीने १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एल.आय.सी कॉलनी, लक्झरी बस स्टॉप समोर, धुळे रोड येथे भव्य ‘आखाजी महोत्सवा’च आयोजन करण्यात आलं आहे.
आखाजी हा केवळ सण नसून खान्देशी संस्कृतीचा कणा मानला जातो. या दिवसाला अहिराणी वाङ्मय दिन म्हणूनही साजरा केला जातो. नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख व्हावी आणि लोककला जपली जावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात खान्देशी लोककला, पारंपरिक गाणी आणि संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून, त्यात खापरावरील पोळ्या बनवणं, झोक्यावर अहिराणी गाणी, गौराई गाणी, घट्यावरील गाणी, वेशभूषा आणि उखाणे स्पर्धांचा समावेश आहे. विजेत्यांना ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसंच, अहिराणी भाषा आणि संस्कृतीवर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम देखील होणार असून, ग्रामीण भागातील बचत गटांकडून गावराणी खाद्यपदार्थ आणि वस्तूंचे स्टॉल लावले जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी राहणार असून उद्घाटन मा. राजेश पांडे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अशोक आधार पाटील हे काम पाहणार आहेत. ग्रामीण संस्कृती आणि आखाजी या विषयावर प्रा. डॉ. योगिता पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
खान्देश साहित्य संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची माहिती देण्यात आली. सर्व पत्रकार बंधूंनी या महोत्सवात सहभागी होऊन खान्देशी संस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.