लोक न्यूज
अमळनेर : शहरातील इंदिरा गांधी भवन येथे उद्या रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेनेच्या वतीने मतदारयादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात बुथ प्रमुखांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मेळाव्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी मा. आ. शिरीषदादा चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच बूथस्तरावर कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास आ. अमोलदादा पाटील (पारोळा-एरंडोल-भडगाव), जिल्हाप्रमुख श्री. विष्णुभाऊ भंगाळे, श्री. वासुदेव पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. सरिताताई माळी, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. रोहित कोगटा, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, हिरा उद्योगचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी, शिवसेना नेत्या ॲड. सौ. ललिताताई पाटील, नगरपरिषद गटनेते श्री. पंकज चौधरी, बांधकाम सभापती श्री. साहेबराव दादा पवार, पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील, शिक्षण सभापती तथा प्रतोद श्री. नाविद शेख यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात मतदारयादी पुनर्निरीक्षण मोहिमेचे महत्त्व, प्रक्रिया, तसेच बूथप्रमुखांनी घ्यावयाची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे.
तरी विधानसभा मतदारसंघातील सर्व शाखाप्रमुख, बुथप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.