लोक न्यूज
अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन कामामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, कामाच्या अत्यंत संथ गतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सुमारे २५ ते ३० दिवसांपासून हे काम सुरू असले तरी अद्यापही ते पूर्णत्वास गेलेले नाही. रस्ते खोदून ठेवलेले असल्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या मते, नगरपालिकेकडून या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. काम सुरू असताना कोणतीही सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही, तसेच कामाच्या ठिकाणी योग्य नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे.
यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन हे काम जलद गतीने पूर्ण करावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.