लोक न्यूज
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गडखांब (ता. अमळनेर) येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतामध्ये बेकायदेशीरपणे लागवड केलेला गांजा जप्त केला. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अमळनेर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
या कारवाईदरम्यान सुमारे 3,333.91 किलो वजनाचा गांजा पिक जप्त करण्यात आला असून त्याची बाजार किंमत अंदाजे 3 कोटी 46 लाख 32 हजार 500 रुपये इतकी आहे. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे CCTNS क्रमांक 43/2026 नुसार NDPS कायद्याच्या कलम 8(ब), 20(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीत पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील तेली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धाडसी आणि कार्यक्षम कारवाईबद्दल जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांचे विशेष प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले आहे.
प्रशंसापत्रात त्यांनी नमूद केले की, अशा प्रकारची उत्कृष्ट सेवा महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद असून भविष्यातही अशाच पद्धतीने कर्तव्य बजावले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अमळनेर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.