लोक न्यूज
जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) प्रभावी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या या आरोपींना शिताफीने पकडण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रधारकांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उमर्टी गावाकडून कृष्णापूर–मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन संशयित इसम मोटारसायकलवरून येत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून हिरोहोंडा (MH-19-S-9450) मोटारसायकल अडवली आणि त्यावरील दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींची नावे राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा) व गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी निष्पन्न झाली.
पंचांसमक्ष झडतीत आरोपींकडून १ गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे, १ मोटारसायकल आणि २ मोबाईल फोन असा सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व पोलीस हवलादर:
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिन्हाडे, दिपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.