अमळनेर:-(लोक न्यूज) येथील नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्रास थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले असून यासंदर्भातील याचिका नगराध्यक्ष पदाचे पराभूत  उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी अमळनेर न्यायालयात दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी दाखल केली आहे.डॉ.बाविस्कर यांनी दाखल केलेले जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करत त्यांना नगराध्यक्ष पदावरून पायउतार करावे अशी विनंती याचिकेत केली आहे.
         न्यायालयात सादर केलेल्या भक्कम पुराव्यानुसार डॉ.बाविस्कर यांना अवघ्या चारच महिन्यात पदावरून पायउतार व्हावे लागेल असा विश्वास श्री ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.ज्या दिवशी डॉ.बाविस्कर यांचे पद्ग्रहण झाले त्याच दिवशी ग्रहण लागणारी ही याचिका दाखल झाल्याने त्यांच्या आनंदात कुठेतरी विरझन पडून पहिल्याच दिवसापासून संघर्ष सुरू झाला आहे.यासंदर्भात जितेंद्र ठाकुर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की अमळनेर नगरपरिषदेत डिसेंबर 2025 च्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती(एस.टी.शे.ट्रा.)प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने मी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी दाखल केली होती.यात शिवसेना शिंदे गटाकडून माझे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ.परीक्षित बाविस्कर होते.प्रत्यक्षात त्यांचे मल्हार कोळी जातिचे प्रमाणपत्र बनावट असताना विरोधी पक्षाने त्यांना उमेदवार मिळत नसल्याने अविचाराने व घाईघाईने उमेदवारी दिली होती.सुरवातीला डॉ.बाविस्कर यांनी विद्यमान आमदार व खासदार यांच्याकडेही उमेदवारीची मागणी केली होती.मात्र त्यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर संशय व्यक्त करून उमेदवारी नाकारली होती.आणि या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्ही कुठेही निवडणूक लढवू नका अन्यथा अडचणीत याल असा प्रेमाचा सल्ला दिला होता.मात्र पदासाठी ते उतावीळ असल्याने विरोधी गटाच्या हाती ते लागलेत आणि कायद्याचे पुरेसे ज्ञान नसलेल्या माजी आमदारांनी जात प्रमाणपत्राची खात्री न करता त्यांना आपल्या शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळवून देऊन अमळनेरकर जनतेच्या भावनांशी खेळ केला. अमळनेरकरांच्या दुर्देवाने डॉ. बाविस्कर हे विजयी देखील झालेत परंतु खऱ्या आदिवासींवर हा अन्याय असल्याने मी त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या खोलावर जाऊन त्यांनी कश्या पद्धतीने बनावट जात वैधता प्रमाणपत्र मिळविले याची संपूर्ण जंत्रीच शोधून काढली आहे.यात पुराव्यांचे मोठे गभाळच माझ्या हाती लागले आहे.
    
         त्यांनी जात पडताळणी विभागाकडून मल्हार कोळी जमातीचे वैधताप्रमाणपत्र मिळविले आहे. मुळात डॉ.बाविस्कर यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा या जमातीशी कोणताही संबंध नसून त्यांचे मूळ गाव असलेल्या पारोळा तालुक्यातील अंबापिंप्रीत एकही कुटुंब मल्हार कोळी नाही आणि जळगाव जिल्ह्यातही नाही असे असताना घरात बसून खोटे पुरावे तयार करत  आर्थिक व्यवहार करून त्यांनी हे बनावट प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण देखील त्यांनी याच बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे घेतले असल्याने त्यांचे शिक्षण देखील राजकारणापायी धोक्यात आले आहे.
    
         शासन व जनतेची ही मोठी फसवणूक असल्याने मी अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात भक्कम पुराव्यांसह याचिका दाखल केली असून अवघ्या चारच महिन्यात डॉ.बाविस्कर पदावरून पायउतार होतील आणि यापुढील योग्य ती कायदेशीर कारवाई देखिल  निश्चितच त्यांच्यावर होईल यात तिळमात्र शंका नाही.जोपर्यंत ते पदावरून उतरत नाही आणि त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी देखील शांत बसणार नाही असा दावा देखील श्री ठाकूर यांनी केला आहे.