लोक न्यूज
अमळनेर (ता. अंमळनेर) | दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) रोजी वावडे केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुष्प पाचवे, मुडी प्र. डांगरी (ता. अमळनेर) येथे उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी वावडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. छगन पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री. प्रमोद पाटील तसेच मारवड बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रावसाहेब पाटील उपस्थित होते. याशिवाय शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अशोक सोनवणे, फापोरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र गवते व अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. भैय्यासाहेब साळुंखे यांची विशेष उपस्थिती लाभली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पाटील हेही कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांनी “मा सरस्वती शारदे…” या गीतावर सरस्वती वंदना सादर केली, तर “इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा” या गीतावर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर व गुरुजनांचे स्वागत थोर व्यक्तींचा परिचय करून देत केले, हा उपक्रम उपस्थितांनी विशेष कौतुकाने दखल घेतली. त्यानंतर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील ठळक बाबी मांडत शैक्षणिक समस्या व उपायांवर सविस्तर चर्चा केली.
मांडळ शाळेचे शिक्षक श्री. विकास पाटील यांनी “सकारात्मक शिस्त” या विषयावर पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. भरवस शाळेचे शिक्षक श्री. सुनील पाटील यांनी “माझा वर्ग, माझे नियोजन” या विषयावर गटकार्याच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच वावडे केंद्र शाळेचे शिक्षक श्री. समाधान खैरनार यांनी “आपत्ती व्यवस्थापन” या महत्त्वाच्या विषयावर उपस्थितांना उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रोहिणी दिनेश बडगुजर यांनी केले. विद्यार्थी मनस्वी पुरुषोत्तम पाटील व इंद्रजीत श्रीराम पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रविंद्र प्रतापराव संदानशिव यांनी केले.