लोक न्यूज
अनुसूचित जमातींच्या आरक्षणात इतर समाजांकडून होत असलेल्या कथित ‘घुसखोरी’ला आळा बसावा आणि आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, या मागणीसाठी आज अमळनेर तालुक्यातील आदिवासी समाज एकवटला. ‘आदिवासी क्रांती दल, शाखा अमळनेर’च्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती महोदयांना उद्देशून प्रांताधिकारी, अमळनेर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
नगराध्यक्ष पद आरक्षणामुळे आनंदोत्सव
निवेदनापूर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून आदिवासी बांधवांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने समाजात आनंदाचे वातावरण होते. फटाके फोडून, मिठाई वाटून आणि घोषणाबाजी करत बांधवांनी बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आरक्षणातील घुसखोरीला विरोध
आदिवासी क्रांती दलाच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, कलम ३४२ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला दिलेले आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठीचे घटनात्मक साधन आहे. काही इतर समाजगट ST प्रवर्गात सामील होण्यासाठी करत असलेल्या मागण्या ‘घटनाबाह्य’ असून, त्या खऱ्या आदिवासींच्या हक्कांवर अतिक्रमण करणाऱ्या आहेत, असेही नमूद करण्यात आले.
प्रमुख मागण्या:
• ST आरक्षणात कोणतीही नव्याने घुसखोरी होऊ नये.
• आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे कठोर संरक्षण व्हावे.
• केंद्र सरकारने या संदर्भात स्पष्ट भूमिका घ्यावी.
या वेळी तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, जितू ठाकूर, मुकेश बिऱ्हाडे, प्रवीण बैसाणे, विनोद मोरे, दयाराम मोरे, रियाज काजी, आनंद पवार, सुनील पवार, मनोज मोरे, रतिलाल पारधी, दिनकर भील आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अंजनाबाई पारधी, जयश्री पारधी, मनीषा पारधी, संगीता पारधी यांच्यासह महिला पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आदिवासी समाजाने राष्ट्रपतींकडे घटनात्मक आरक्षणाचे रक्षण करण्याची आणि आरक्षणातील घुसखोरी थांबविण्याची मागणी केली आहे.