लोक न्यूज
अमळनेर : भूमिपुत्र आमदार अनिल पाटील या आपल्या नेत्याचा वाढदिवस भला मोठा हार, पुष्प गुच्छ किंवा केक कापून साजरा न करता  त्यांची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  व ग्रुप ग्रामपंचायत अंतुर्ली रंजाणेचे माजी सरपंच सचिन बाळू पाटील यांनी अत्याधुनिक रुग्णवाहिका तयार करून तिचा लोकार्पणाचा मानस केला आहे. यामुळे मतदार संघातील अपघातग्रस्त आणि अडल्या नडल्या गरजूंना एक चांगल्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
भूमिपूत्र अनिल पाटील यांचा ७ जुलै रोजी वाढदिवस आहे. ते नेहमीच आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसेाठी तत्पर असातात. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची सदिच्छांसाठी मोठी गर्दी असते. म्हणूच त्यांचा यंदाचा वाढदिवस हा आगळावेगळा व्हावा, यातून त्यांच्या प्रेरणेने समाजोपयोगी काही मिळावे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन दादा पाटील  यांनी स्वखर्चाने एक अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका तयार केली आहे. शहरासह तालुक्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे, रात्री अपरात्री रुग्णांना शासकीय रुग्णवाहिका मिळण्यास अडचणी येतात. अनेकदा १०८ रुग्णावाहिकेवर ताण पडत असल्याने ती येण्यास उशिर होतो. त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. नुकतीच एक महिलेची रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. त्यामुळे रुग्णवाहिकेची अत्यन्त आवश्यकता होती.

रुग्णवाहिकेची २४ तास सेवा

ही रुग्णवाहिका  क्रमांक एम एच  -५४- ९०९९ आहे.  ही गाडी आमदार अनिल पाटील यांच्या घरासमोर २४ तास उभी राहणार आहे. त्यावर संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक असेल. त्यामुळे गरजूंना तत्काळ संपर्क साधून या रुग्णवाहिकेचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे त्यावरील चालकाचा आणि इंधनाचा खर्च सचिन पाटील स्वत: करणार आहे. केवळ नफा ना तोटा या तत्त्वावर ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशी आहे अत्याधुनिक सुविधा

या रुग्णवाहिकेमध्ये रुग्णांसाठी आॅक्सिजन सिलिंडर राहणार आहे. मेडिकल टूल बाॅक्स, डाॅक्टराना  बसण्याची सुविधा असेल.  भविष्यात इतर रुग्णांसाठी आवश्यक असलेला कार्डियाकही बसवला जाणार आहेत. विशेष म्हणजे अत्याधुनिक स्ट्रेचर बनवण्यात आले आहे. त्यावर केवळ एकटा चालक अपघातग्रस्ताला तातडीने उचलून रुग्णालयात पोहचवू शकतो. यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. गाड्यांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याने अग्निशमन यंत्रणा  त्यात बसवण्यात आली आहे.