लोक न्यूज
अमळनेर :  असं म्हणतात हौसेला मोल नसते...कुणी मुलांसाठी , प्रेयसीसाठी ,बायकोसाठी काहीही करायला तयार असते. एका आजोबाने आपल्या नातवाच्या जाऊळच्या कार्यक्रमासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ५१ बकऱ्यांची मानता दिली आणि त्यासाठी सुमारे १५ लाख रुपये  खर्चही केले.
     वाल्मिकी मेहतर समाजाचे  जमदार विकास जाधव उर्फ बुद्धा भैय्या यांनी आपला पाच सहा वर्षाचा नातू जिगर नितेश जाधव याच्या जाऊळचा कार्यक्रम १८ रोजी आयोजित केला होता. लहान बाळाच्या कार्यक्रमासाठी एखाद्या विवाह पत्रिकेप्रमाणे मोठी पत्रिका छापली होती. भाऊबंद ,नातेवाईक , समाजातील नागरिक सह इतर प्रतिष्ठित नागरिक मित्र परिवार  याना बोलावून सुजाण मंगल कार्यालयात जाऊळचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.  आणि  एक... दोन... अकरा एकवीस..  नव्हे तर तब्बल ५१ बकऱ्यांची मानता दिली. आणि भरमसाठ खर्च जसा कार्यक्रमाला केला त्याचप्रमाणे सामाजिक भान ठेवून  त्यांनी आपले दैवत रामदेवजी बाबा यांच्या मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी देऊन मंदिराचा जिर्णोध्दारही केला. यासाठी त्यांना किशोर जाधव , विक्की जाधव , विशाल जाधव , नितेश जाधव यांनी सहकार्य केले. जाधव परिवाराने धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर केलेला खर्च विक्रम ठरला आहे. शेवटी म्हणतात ना हौसेला मोल नसते.