लोक न्यूज-
अमळनेर : एका रुग्ण महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने तिला जीव गमवावा लागल्याप्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांच्यावर भा.द.वि. कलम ३०४-अ आणि ३२८ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत  येथील मे. न्यायदंडाधिकारी वर्ग -१ यांनी प्रोसेस इश्यू केली आहे.
    सविस्तर वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील चिखलोड येथील ज्ञानेश्वर राघो पाटील यांनी तक्रार केली आहे की त्यांची पत्नी अनिता पाटील यांना ९ सप्टेंबर, २०२१ रोजी डॉ. अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. अनिल शिंदे यांनी रुग्ण अनिता पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले व कामात निष्काळजीपणा केला व रुग्णास पुढील उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यादरम्यान रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. डॉ. शिंदे यांनी योग्य वेळेत निर्णय घेतला नाही व जास्त दिवस त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करुन ठेवले होते.
    नातेवाईकांनी अनिता पाटील यांना मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये ५ आॅक्टोंबर, २०२१ रोजी दाखल केले असता डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाची परिस्थिती सुधारण्यासारखी नाही, त्यांचे शेवटचे तास शिल्लक आहेत, त्यामुळे त्यांना घरी घेऊन जा असे सांगितले असता, घरी परत येत असताना ६ आॅक्टोंबर, २०२१ रोजी नाशिक ते ओझर दरम्यान अनिता पाटील यांचा मृत्यू झाला.
    अनिता पाटील यांच्या मृत्यूस डॉ. अनिल शिंदे कारणीभूत असल्याची तक्रार त्यांचे पती ज्ञानेश्वर पाटील यांनी अमळनेर येथील मे. न्यायदंडाधिकारी वर्ग -१ यांच्याकडे दाखल केली असता दाखल कागदपत्रे व अ‍ॅड. सुरेश सोनवणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपी डॉ. अनिल शिंदे यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम ३०४-अ आणि ३२८ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्या बाबत प्रोसेस इश्यू केली आहे.