लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे सार्वजनिक बांधकाम अमळनेर विभाग अंतर्गत येणाऱ्या पातोंडा मठगव्हाण रस्त्याच्या दुतर्फा मोठया गटारींची पोलीस लाईन ते सुटवा नाल्यापर्यंत  आवश्यकता असून सदरील काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात यावे अशी मागणी होत आहे.याबाबत अनेकवेळा सामाजिक कार्यकर्त्याकडून निवेदने दिली गेली असून ग्राम पंचायतीनेही त्याबाबतचे पत्र दिलेले आहे.
पातोंडा गावांमधून तापी काठावर वसलेल्या मठगव्हाण,नालखेडा, खापरखेडा,गंगापुरी, रुंधाटी, मुंगसे,दापोरी आदी गावांकडे जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा डांबरीकरणाचा रस्ता आहे. सदर रस्ता पातोंडा महावितरण केंद्रापासून ते सुटवा नाल्यापर्यंत अरुंद झालेला असून त्याच्या रुंदीकरणाची देखील आवश्यकता आहे. मराठी शाळेच्या परिसरातील एका सार्वजनिक नळ कनेक्शन जवळ दरवर्षी पावसाळ्यात मोठी डाब तयार होत असते. त्यामुळे अपघातांची संभावना निर्माण होते तर वाहनधारकांसहित ग्रामस्थांना त्या डबक्यातून वाट काढावी लागत असते. तर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारी फार जुन्या काळाच्या असून बांधकाम जीर्ण झाले असून रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलेल्या आहेत. गटारींचे पाणी रस्त्यावर येऊन डबके भरतात परिणामी रस्ता खराब होत आहे. गटारींचे पाणी थेट सुटवा नाल्यापर्यंत पोहोचत नाही. सदर गटार ही गावातील सर्व गटारींचे पाणी वाहून नेणारी मुख्य गटार आहे. पण गटारीची अवस्था जीर्ण असून सदर गटारींचे ग्राम पंचायत स्तरावर आर्थिक तरतुदीमुळे नविन बांधकाम शक्य नसल्याने त्यांचे बांधकाम रखडले आहे.म्हणून सदर गटारींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्हावे याकरिता गावांतील सामाजीक तरुणांनी सार्वजनिक बांधकाम अमळनेर विभागाला या बाबतीचे निवेदने दिली होती. व पाठपुरावा देखील करण्यात आला होता. सा. बां.विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर काम करण्याचे आश्वासन देखील दिले होते.पण वर्षे उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीच कार्यवाही केली नसल्याने तरुणांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. सा. बां. विभागाकडून अमळनेर चोपडा रस्त्यावर नांद्रीच्या नाल्यापासून बऱ्याच अंतरावर मोठ्या गटारींचे बांधकाम केलेलं असून त्याच पध्दतीच्या बांधकामाच्या गटारी पातोंडा मठगव्हाण रस्त्यावरील गटारींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर काम मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थांमधून व वाहनधारकांमधून होत आहे.