लोक न्यूज-
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.
 
अक्षय्य तृतीया हे व्रत कसे करावे?
या दिवशी  व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन
नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे. 

उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.
अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?
हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे. या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. 
थोडक्यात काय तर कोणतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.