जालना-लोक न्यूज
 
जालना : प्रशासनातील भ्रष्टाचार, लाचखोरीच्या सुरस कथा दररोज बाहेर येत आहे. महसूल, विभागात लाचखोरीने अक्षरश: कळस गाठल्याचे दिसून येत आहे. कदिम जालना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश शेषेराव शिंदे यांना ७५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने जालन्यात एकच खळबख उडाली. पोलीस दलात लाचखोरी किती शिगेला पोहोचली आहे, हेच यावरून दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळालेला असल्याने तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कलम ११० ऐवजी कलम १०७ प्रमाणे करण्या- साठी गुन्ह्यात मदत  करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे याने केली होती. यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत
प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. तडजोडीनंतर त्यांनी तक्रारदाराकडून ७५,०००/- रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारले. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळा पथकाचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह पोलीस उपनिरिक्षक याने सापळा पथकास ताब्यात घेण्यास  अडथळा निर्माण करून स्वतःचे खाजगी वाहनाने पळ काढला. सापळा पथकाने सुमारे ३ किलोमीटर पाठलाग करून पकडले असता आरोपीने लाचेची रक्कम पाठलाग करतेवेळी फेकून देऊन पुरावा नष्ट केला.
सापळा पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये रोख रु. ९,४१, ५९० /- व २५ तोळे (२५० ग्रॅम) सोने मिळून आले असल्याची सुत्राकडून माहीती मिळाली. आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदिम जालना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत  सुरू होती. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक औरंगाबाद, सापळा पथक पो. अ. नागरगोजे, पो. अं. काळे ई.च्या वतीने करण्यात आली.