लोक न्यूज-
अमळनेर नगरपालिकेच्या स्थापनेला सुमारे 150 वर्ष पूर्ण झालेली असून या दीडशे वर्षात अनेक मान्यवर प्रतिष्ठित नगराध्यक्ष होऊन गेलेत. त्या सर्वच नगराध्यक्षांमध्ये अमळनेरच्या तोडीस तोड फक्त एकच नाव आहे ते म्हणजे अमळनेर नगरीचा सर्वार्थाने कायापालट करणारे माजी नगराध्यक्ष कै. काकासाहेब देवाजी बुधा महाजन. एक अति उत्कृष्ट काँग्रेसचे  नेते, एक उत्कृष्ट राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, उत्कृष्ट व्यापारी, उत्कृष्ट कामगार नेता व उत्कृष्ट मातृभूमीचा भूमिपुत्र ह्यांचा प्रीती संगम म्हणजे कै. काकासाहेब देवाजी बुधा महाजन होय.
  कै. देवाजी काकांचा जन्म एका अति सामान्य शेतमजूर घरात झाला. वडील कै. बुधा दशरथ महाजन हे बैलगाड्यांनी रेल्वे स्टेशन पासून गावात मालाची वाहतूक करीत असत. आठ भावंडांचे व 80 लोकांचे एकत्रित कुटुंब. या 80 जणांचा कुटुंब प्रमुख होते कै. ढोमण बुधा महाजन. तेही अमळनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष होते. कै. ढोमणतात्या 1950 साली नगराध्यक्ष झाले होते. ते सन 1945 सालापासून नगरपालिकेचे नगरसेवक व सन 1948 साली नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष होते. सन 1949 मध्ये ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन होते. खऱ्या अर्थाने देवाजी काकांचे मालक-पालक चालक होते. ढोमणतात्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली देवाजी काकांची राजकीय, सामाजिक, औद्योगिक कार्याची जडणघडण झाली. या एकत्रित कुटुंबाचे आतापर्यंत 11 जण अमळनेर नगरपालिकेत नगरसेवक झालेले आहेत. यात सर्वश्री ढोमण बुधा महाजन, देवाजी काका महाजन, सुधाकर जिभाऊ महाजन, भगवानभाऊ महाजन, माधवरावदादा महाजन, बाळकृष्ण महाजन, मिराबाई महाजन, धनंजय महाजन, ज्योतीबाई महाजन आदिचा समावेश आहे. अमळनेर नगरपालिकेत मागील 75 वर्षापासून माळी समाजाचे सात ते आठ नगरसेवक प्रत्येक निवडणुकीत निवडून येतात. या सर्वांचे कै. ढोमणतात्या महाजन, देवाजीकाका महाजन व कै. भास्करराव चव्हाण हे कायमस्वरूपी  प्रेरणास्थान होते. देवाजीकाकांचा आठ भाऊ व एक बहीण असा परिवार होता. भावंडांमध्ये त्यांचा नंबर सातवा होता. बंधूमध्ये वामनराव, ढोमनतात्या, चिंतामणराव, बाबुराव, शामराव, शिवाजीराव, देवाजीकाका, बाजीराव असा क्रम होता.
  अमळनेर नगरी श्री संत सखाराम महाराजांची पावनभूमी परमपूज्य साने गुरुजींची कर्मभूमी व श्रीमंत प्रताप शेठजींची उद्योग भूमी म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. तसेच अमळनेरात भांडारकर, देशमुख, देशपांडे, ब्रम्हे, मुठे, माळी आणि मिस्त्री यांची प्रामुख्याने मोठमोठी कुटुंबे होती आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आणि व्यापार होता. खानदेशातील अंमळनेर व अडावद येथील देशमुख पंचक्रोशीत खानदानी देशमुख म्हणून सुप्रसिद्ध होते. वरील सर्व मान्यवर कुटुंबातील मान्यवरांचा मंडळींचा अंमळनेरच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा होता. मग ती अमळनेर नगरपालिका, अर्बन बँक खानदेश शिक्षण मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, शेतकरी संघ आदी संस्थांची पायाभरणी उभारणी उत्कर्ष याच्यात सिंहाचा वाटा होता. अशाच एका शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महाजन कुटुंबातून देवाजीकाका पुढे आले. आठ पैकी सहा भाऊ हे श्रीमंत प्रताप शेठजींच्या प्रताप मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत होते. अशा या सर्वच बंधूंना ढोमणतात्यांनी उद्योग-व्यवसायात संपूर्ण कुटुंबाला नवीन दिशा दिली. मुख्य म्हणजे सर्वच बंधूंनी तात्यांना तन-मन धनाने साथ दिली. अशा प्रकारे हा कुटुंबाचा वटवृक्ष वाढतच गेला.
  कै. देवाजी काका अमळनेर नगरपालिकेचे सुमारे 30 वर्ष नगरसेवक होते. सतत सात वर्षे नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवाजी काका होते. तो अमळनेर नगरपालिकेच्या सुवर्णकाळ होता नगराध्यक्ष देवाजी काका व चीफ ऑफिसर म्हणून कै. विनायकराव झंझणेसाहेब म्हणजे महाभारतातील श्रीकृष्ण व अर्जुनाची जोडी होती. या जोडगोळीने नगरपालिकेत एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही आणि भ्रष्टाचार होऊ दिला नाही. आज ज्यांचे वय 60 ते 80 च्या दरम्यान आहे यांना देवाजी काका झंझणेसाहेब नक्कीच आठवत असतील.
 तो सुवर्ण काळ या लोकांनी अनुभवला देखील आहे त्याकाळी अमळनेर दररोज दोन वेळेस अर्धा अर्धा तास पाणीपुरवठा होत असे. विशेष म्हणजे विना इलेक्ट्रिक मोटर शिवाय पाणी पूर्ण दाबाने तिसऱ्या मजल्यावर जात होते. आज मात्र अमळनेरकरांना बारमाही पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे तेही इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने. त्यांच्या कालावधीतच अमळनेरात लालबाग व झामी चौकात मोठ्या पाण्याच्या टाक्या बनविल्या गेल्या होत्या. देवाजीकाकांच्या नंतर अमळनेरात सुरळीत पाणीपुरवठा केला असेल फक्त दुसरे लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. सुरेशशेठ ललवाणी यांनीच. याचप्रमाणे तापी पाणीपुरवठा सुरू करणारे अमळनेर नगरीचे प्रथम लोक नियुक्त नगराध्यक्ष कै. देसराजजी अग्रवाल होते. देवाजीकाकांच्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीतील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे अमळनेर सर्वात मोठा रिंग रोड विप्रो फॅक्टरीचा रेल्वे बोगद्यापासून ते माळीवाडा आणि माळीवाडा ते मुंबई गल्ली, पूर्ण सिमेंट काँक्रेटने बनविला गेला होता. सदरचा रिंग रोड हा आठ ते दहा किलोमीटरचा आहे सदरचा रिंग रोड हा अमळनेरकरांनी 35 ते 40 वर्षे वापरला एवढे त्याची मजबूत बांधकाम होते. आणि आता त्याच भक्कम रिंग रोडवर डाग-डूजी करून डांबरीकरण करून दरवर्षी लाखो रुपयांची बिले स्वाहा होत आहेत. त्याचप्रमाणे मुंबई गल्लीतील सरकारी दवाखान्याचे नूतन वास्तूचेही बांधकाम देवाजीकाकांच्या कालावधीत झालेले आहे सुसज्ज दवाखाना व कर्तव्यदक्ष मेडिकल ऑफिसर कै. ए आर सेन हे हजारो रुग्णांचे श्रद्धास्थान होते तो सरकारी दवाखाना डॉक्टर सेन यांच्या नावाने ओळखला जात होता. अमळनेर नगरपालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन करून देण्यासाठीहि देवाजी काका कटिबद्ध होते. कुंटे रोडवरील महात्मा फुले शॉपिंग सेंटर व परमपूज्य साने गुरुजी मार्केटची निर्मिती फक्त आणि फक्त देवाजी काकांमुळेच झाली आणि नगरपालिकेला पहिल्यांदाच लाखो रुपयाच्या उत्पन्नाचे साधन मिळवून दिले. त्या ठिकाणी पांचाळ समाजाच्या लोकांची झोपडपट्टी होती. पांचाळ लोकांच्या झोपडपट्ट्या काढणे महाकठीण काम होते.परंतु देवाजी काकांनी पूर्ण पोलीस बंदोबस्तात सदरच्या झोपड्यांचे अतिक्रमण काढून फेकून दिले. महात्मा फुले व परम पूज्य साने गुरुजी ही देवाजीकाकांचे प्रेरणास्थान असल्यामुळे दोन्हीही शॉपिंग सेंटरला सदरच्या महापुरुषांची नावे देण्यात आली. अमळनेर ही परम पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे या कर्मभूमीत परमपूज्य साने गुरुजींचे प्रथम स्मारक बनविण्याचे श्रेय फक्त देवाजी काकांना जाते . त्यानंतर सन 1972 साली विक्टोरिया जुबली लायब्ररीचे नामकरण परम पूज्य साने गुरुजी वाचनालयात झाले. तसेच सन 1980 मध्ये अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव बापू पाटील यांनी परम पूज्य साने गुरुजी विद्यालयाची स्थापना केली आणि आता अनेक मान्यवरांच्या सहकार्याने अंमळनेरला गळवाडे रोडवर परमपूज्य साने गुरुजी स्मारकाची भव्य दिव्य प्रमाणात निर्मिती होत आहे. त्यासाठी काम जोराने सुरू आहे.
  काँग्रेस व देवाजीकाका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसचा नेता कसा असावा तर फक्त देवाजी काकांसारखाच. सन 1967 व 1972 साली त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार होते. परंतु ते मिळाले नाही तरीही ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचेच होते. जणू काही काँग्रेसही त्यांच्या नसानसात भिनलेली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंबच काँग्रेसवासी होते. सुमारे 70 ते 75 वर्षांपूर्वी अंमळनेरात कम्युनिस्टांच्या कामगार संघटना मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या. त्या कम्युनिस्ट प्रनित कामगार संघटनांवर पहिला प्रहार देवाजी काकांनीच केला. त्यावेळी त्यांनी अंमळनेर राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इंटकची स्थापना करून इंटकची कामगार संघटना जोमात आणली. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती कै. नामदार दाजीबा पाटील यांच्या राजकीय जडणघडणीत देवाजी काकांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर अमळनेर कम्युनिस्ट प्रणित कामगार संघटना लयास गेल्या आणि फक्त इंटकचीच कामगार संघटना शिल्लक राहिली. त्यामुळे त्यांचे कामगार क्षेत्रातील भरीव कामगिरी दिसून येते. त्यांच्याच कारर्कीर्दीत ती नगरपालिका माध्यमिक शाळा सुरू झाली त्यामुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांना सहज शिकता आले. पूर्वी नगरपालिकेच्या 33 प्राथमिक शाळा व नगरपालिका माध्यमिक शाळा होत्या या सर्वच शाळांमधून हजारो विद्यार्थी शिकून राज्याच्या व देशाच्या विविध स्तरावर उच्चपदी पोहोचलेले आहेत. स्वतः देवाजी काकांचे शिक्षण खूपच कमी होते परंतु त्यांना शिक्षणाविषयी खूपच आस्था होते त्यांनी आपल्या घराण्यातील पुढच्या पिढ्यांना मात्र उच्चशिक्षितच केले. त्यांचे एक जावई कै. प्राचार्य सदाशिवराव माळी हे मात्र काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार झाले होते त्यांना खूपच अभिमान वाटत होता माझ्या भाग्यात आमदारकी नव्हती परंतु माझ्या जावईला काँग्रेसने आमदार केले असे ते मोठ्या गौरवाने सांगत असत. देवाजी काका म्हणजे उभय खानदेशातील माळी समाजाचे भूषण होते. माळी समाजातून त्यांना कायमच मानसन्मान मिळत असे जळगाव जिल्ह्यात माळी समाजाची श्री सावता माळी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेचे देवाजीकाका अनेक वर्ष अध्यक्ष होते.
 कै. देवाजीकाका हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनेक वर्ष प्रदेश प्रतिनिधी होते तसेच अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अनेक वर्ष जनरल सेक्रेटरी होते. अमळनेर शहराच्या विकासासाठी हातभार लागावा त्यासाठी त्यांनी आपल्या शिष्टमंडळासह भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधींची त्यांच्या पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय इंदिराजींना आपल्या मागण्या उत्तम रीतीने मांडल्या होत्या इंदिराजीं त्यावेळी देवाजीकाकांच्या विकास कामावर अतिशय खुश झाल्या होत्या. राष्ट्राच्या राजकारणात देवाजी काकांवर विधानसभेचे माजी अध्यक्ष कै. बाळासाहेब चौधरी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी मुख्यमंत्री कै. यशवंतरावजी चव्हाण, कै. वसंतरावजी नाईक, कै. वसंत दादा पाटील, कै. शंकररावजी चव्हाण आदी मान्यवरांचे वेळोवेळी सहकार्य मार्गदर्शन व आशीर्वाद मिळालेले आहेत. सच्चा काँग्रेस प्रेमी,  नेहरू गांधीं घराण्यावर पूर्ण श्रद्धा असणाऱ्या व सर्वसामान्य जनतेची कायमस्वरूपी नाळ जोडणाऱ्या देवाजी काकांना आम्ही कडक काँग्रेसी सलाम ठोकून त्यांना विनम्र अभिवादन करतो.
  सदरच्या लेखासाठी श्री शेखर यशवंतराव महाजन व प्राध्यापक दिलीप शामराव महाजन यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
  सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे  व या लेखाचे शब्दांकन श्री योगेश पाने यांनी केलेले आहे.