लोक न्यूज
अमळनेर, १० डिसेंबर २०२५: अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील रहिवासी अतुल निंबाजी बाविस्कर यांनी २२ वर्षांच्या समर्पित आणि शौर्यपूर्ण सेवे नंतर भारतीय सैन्य दलातून ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या सेवेत त्यांनी अनेक कठीण परिस्तिथींमध्ये देशसेवेचे कर्तव्य निभावले, ज्यामुळे त्यांचा गावात आणि सैन्यात विशेष सन्मान आहे.
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने ४ डिसेंबर रोजी गांधली गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी आणि सेवानिवृत्त सैनिकांची सुरक्षा रक्षक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मिरवणुकीत गावभर वाजत गाजत परेडसह अतुल बाविस्कर यांचे स्वागत करण्यात आले.
मिरवणुकीपूर्वी अमळनेर रेल्वे स्थानकावरही त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. गावचे सरपंच नरेंद्र पाटीलमहेंद्र पाटील आणि रिता ताई बाविस्कर यांनी त्यांचे सत्कार केला, तर खासदार स्मिता ताई वाघ यांनीही अतुल बाविस्कर यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अतुल बाविस्कर यांचा लहान भाऊ राहुल पाटील देखील भारतीय सैन्यात सेवा बजावत आहे. मोठा भाऊ सेवानिवृत्त झाला तरी, लहान भाऊ सीमारेषेवर देशाचे रक्षण करत राहणार असल्याने गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना पसरली आहे.
गावकऱ्यांनी अतुल बाविस्कर यांच्या शौर्य, निष्ठा आणि समर्पित सेवेचे विशेष कौतुक केले. अनेकांनी त्यांना भविष्यातील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या योगदानाची महती ओळखली. गावात त्यांच्या सेवेला वंदन करणारी ही मिरवणूक भावनिक आणि अभिमानास्पद ठरली.