लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारात महसूल विभागाच्या पथकावर अवैध वाळू उत्खनन थांबवण्याच्या कारवाईदरम्यान जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. मारवड पोलिस ठाण्यात बी.एन.एस. 2023 चे विविध कलम, महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पुरुषोत्तम शिवाजी पाटील (मंडळ अधिकारी, वा वडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 6 डिसेंबर 2025 रोजी महसूल पथकासह अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात विशेष गस्त घालताना ही घटना घडली. रात्री सुमारे 1 वाजता पथक पांझरा नदीकाठी पोहोचले असता, पिवळ्या रंगाचे JCB (MH 15 BW 9459) आणि दोन ट्रॅक्टर (विनाक्रमांक) वाळू उत्खनन करताना दिसून आले.

परवानगीची विचारणा करताच चालकांनी टाळाटाळ केली. मशीनरी तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी सांगितल्यावर परिस्थिती गंभीर झाली. त्याच वेळी 5–6 मोटरसायकलवर आलेले 10–12 अनोळखी इसम हातात लाठ्या-काठ्या घेऊन पथकावर धावून आले. त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत “जेसीबी आणि ट्रॅक्टर सोडा, नाहीतर जीव घेऊ” अशी धमकी दिली.

हल्ल्यात एका इसमाने मंडळ अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यावर स्प्रे फवारला तर दुसऱ्याने काठीने मारहाण केली. यावेळी एका हल्लेखोराने फिर्यादीच्या कपाळावर गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी जेसीबी, दोन्ही ट्रॅक्टर आणि मोटरसायकलसह पळून गेले.

घटनेची माहिती वरिष्ठ यंत्रणेला दिल्यानंतर, मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देत तपास पथकाला गती दिली.

मारवड पोलिस स्टेशनचे स.पो.नि. जिभाऊ पाटील, पोउपनि. विनोद पवार, तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सागर अशोक कोळी, विकास पाटील आणि किरण कोळी या तीन आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पुढील तपास पोउपनिरीक्षक विनोद पवार करत आहेत. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे अवैध वाळू माफियांच्या हालचालींवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


“एपीआय जीभाऊ पाटील आणि पीएसआय विनोद पवार यांनी संबंधित प्रकरणातील आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेने आरोपींकडून आणखी माहिती व पुरावे मिळण्याची गरज असल्याचे नमूद करून पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने मागणी ग्राह्य धरत आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस दलाकडून युद्धपातळीवर सुरू असून या प्रकरणातील आणखी काही महत्त्वपूर्ण बाबींसंदर्भात चौकशी अपेक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.”