अमळनेर : लोक न्यूज 
आगामी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना शिवसेना (शिंदे गट) तर्फे प्रभाग क्र. ७(अ) – महिला राखीव या मतदारसंघातून प्रा. डॉ. नयना कैलास पाटील यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्या  बापूसो के. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत.
प्रचाराच्या प्रारंभी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डॉ. पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना जिवनमूल्यांच्या संरक्षणाची हमी देत लोकशाही मूल्यांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा वेध घेऊन त्या अधिक जलद गतीने आणि परिणामकारक पद्धतीने सोडविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की—
• प्रभागातील पायाभूत सुविधा सुधारून सर्वांगीण विकास घडविणे
• विशेष गरजू व वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणे
• बालक ते पालक सक्षमीकरणासाठी उपयोजित उपक्रम राबविणे
• शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जनकल्याणाला प्राधान्य देणे
या मुद्द्यांवर आपल्या कामाचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साम–दाम–दंड–भेद या राजकारणाला बगल देऊन वकृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या त्रिसूत्रीवर आम्ही नेतृत्व करण्यास इच्छुक आहोत,” असे त्या म्हणाल्या. “केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनच जनसेवा करण्याचा आमचा आजवरचा प्रवास आहे. येणाऱ्या काळातही हीच परंपरा अधिक दृढ करण्यासाठी मतदारांनी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे,” असे त्यांनी आवाहन केले.
निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग ७(अ) मध्ये प्रचाराची रणधुमाळी रंगू लागली असून विविध पक्षांचे उमेदवार मतदारांशी संपर्क साधण्यास सक्रिय झाले आहेत. डॉ. नयना पाटील यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.