लोक न्यूज
अमळनेर : राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसागणिक भयावह होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येथील मंगळग्रह सेवा संस्था या सामाजिक जाणिवेचे उचित भान राखणाऱ्या संस्थेतर्फे दिवाळीपर्वाच्या सुरूवातीला ‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया... त्यांचे घरही आनंदाने प्रकाशमान करूया!’ असे आवाहन केले आहे.
या अभिनव उपक्रमास मंगळवार, दि. 3 नोव्हेंबरपासून सकारात्मक प्रतिसाद मिळणे सुरू झाले आहे. धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील मूळ रहिवासी व धुळे येथील वाडीभोकर रोडवरील डिजिटल मार्केटिंग ॲण्ड डिझायनिंग व्यवसाय करणारे लोटन शरद पाटील (कचवे) व त्यांच्या मातोश्री
गं. भा. मथुराबाई पाटील यांनी आज दातृत्व आणि कर्तृत्व दाखवत माणुसकीची पणती पेटवत स्वखर्चाने आणलेला दिवाळी फराळ मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केला.
श्री. लोटन पाटील यांच्या हाती आजच अमळनेरसह जळगाव व धुळे जिल्ह्यात वृत्तपत्रांतून वितरीत करण्यात आलेले भावनिक आवाहनाचे पॉम्प्लेट वाचले. त्यानंतर तत्काळ आपल्या मातोश्रींसमवेत दिवाळी फराळ घेऊन आज श्री मंगळग्रह मंदिर मंदिर गाठले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व डी. ए. सोनवणे यांनी श्री. पाटील यांनी आणलेला हा दिवाळी फराळ आदरपूर्वक स्वीकारला. त्यानंतर श्री. पाटील व त्यांच्या मातोश्रींनी जपलेल्या या सकारात्मक सेवाभावाचे विश्वस्त मंडळाकडून तोफ्लडभरून कौतुक करण्यात येऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेला मिळतोय
भरभरून प्रतिसाद आणि होतेय कौतुक
आजच (मंगळवार, दि. 3 नोव्हेंबर 2026) मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दिवाळी फराळ, नवीन कपडे किंवा सुस्थितीतील कपडे, अन्नधान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू गरजवंतांची दिवाळी गोड करण्यासाठी श्री मंगळग्रह मंदिरात आणून द्यावे, किंवा स्वतः वाटावे या स्वरूपाचे भावनिक आवाहनात्मक पॉम्प्लेट अमळनेरसह जळगाव व धुळे जिल्ह्यांत वितरीत करण्यात आले. त्यामुळे दिवसभर मंगळग्रह सेवा संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि भावनिक आवाहनाचे अनेकांकडून फोनकॉलद्वारे भरभरून कौतुक करण्यात आले. त्यात मंदिर व्यवस्थापन सांभाळणाऱ्या एका संस्थेकडून अशा प्रकारचे भावनिक आवाहन होणे, ही बाब अतिशय अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, असे सांगत आम्ही दिवाळी फराळासह इतरही वस्तू मदतरूपाने देण्यास तयार आहोत, असेही अनेकांनी सांगितले. अनेक लोक या उपक्रमांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात फराळ व अनेक वस्तू स्वतः मंदिरात आणून देण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत; तर अनेकजण वेगवेगळ्या भागांत जाऊन ते स्वतः वाटप करणार असल्याचेही सांगण्यात आले. आज सर्वप्रथम दिवाळी फराळ थेट मंगळग्रह सेवा संस्थेकडे आणून देणाऱ्या सेवाभावी आई व मुलाची प्रातिनिधिक स्वरूपात दखल घेऊन सदर वृत्त व छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.