लोक न्यूज
मांडळ दि. २८ ऑक्टोबर २०२६, बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडळ येथे शिक्षण परिषदेचे आयोजन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख राजेंद्र वारुळे सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने व स्वागतगीताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी 'पाणी वाचवा' या विषयावर सुंदर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गीतासोबतच विद्यार्थ्यांनी कृतीतून पाणी बचतीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे ताई यांनी निपुण चाचणीसंदर्भात सविस्तर व अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती, मूलभूत भाषा व गणितीय कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रप्रमुख राजेंद्र गावते सर (केंद्र फाफरे) यांनी आपल्या मनोगतातून विविध शैक्षणिक विषयांवर विचार मांडले. तसेच सुनील पाटील सर यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची भूमिका, अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट सांस्कृतिक व शैक्षणिक सादरीकरणाबद्दल त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी छगन पाटील सर (मुख्याध्यापक, जावखेडे), अनिता मॅडम (वावडे), अलका मॅडम (लोन), वैशाली भामरे मॅडम (मुख्याध्यापक, मुडी), रमेश चव्हाण सर (लोनपंचम), केंद्रप्रमुख राजेंद्र वारुळे सर आणि अनिल सूर्यवंशी सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विकास भामरे सर यांनी केले. या शिक्षण परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक जगदीश पाटील, मंगला चव्हाण, मीना पाटील, संगीता पाटील व नीलम चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षकांना शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, नवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी ही शिक्षण परिषद निश्चितच उपयुक्त ठरली. उत्साहपूर्ण वातावरणात आणि उपस्थितांच्या आभारभावनेत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.