लोक न्यूज
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटेपासून सुरू झालेला ‌‘मंगल‌’ महाजागर भाविकांनी दिवसभर अनुभवल्याचे पाहावयास मिळाले. निमित्त होते मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याचे. श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती असलेल्या श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अलौकिक श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा अत्यंत चैतन्यमय वातावरणात भक्तिभावाने विधीवत साजरा झाला.

पहाटे ४ वाजता श्री मंगळ सोहळ्याचे विशेष मानकरी जिल्हाधिकारी मा. श्री. रोहनजी घुगे यांच्या शुभ हस्ते श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने या सोहळ्याची सुरूवात झाली. सकाळी ६ वाजता दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी परिवारासह वाद्यवृंदाच्या गजरात नवे ध्वज मंदिरात आणले. जिल्हाधिकारी श्री. घुगे व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, फुलराणी ग्रुपच्या महिला भगिनी, व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी, मंगल सेवेकरी सौ. आशाताई महाले, प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, ए. डी. भदाणे, पुषंद ढाके, आशिष चौधरी यांच्यासह सेवेकऱ्यांनी त्यांचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. श्री. घुगे यांनी ध्वजाचे व ध्वजाचे मानकरी असलेल्या पांडव दाम्पत्याचे औक्षण केले. याप्रसंगी संबळ वादन आणि भेरच्या आवाजाने परिसरात मंगलमय वातावरण निर्मिती झाली. साडेसहाच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर सामूहिकरित्या देवांचा पाळणा म्हटला गेला. ७ वाजता ध्वजपूजन होऊन विधीवतरित्या कळसावरील व मुख्य प्रवेशद्वारावरील जुने ध्वज उतरवून नवे ध्वज तेथे लावण्यात आले. माजी सैनिक असलेल्या मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी ध्वजाला मानवंदना दिली. ८ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाआरती होऊन ८.३० वाजता संभाजीनगर येथील किशोर व श्रीकांत या उपाध्याय बंधूंनी देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे उपस्थित होते. उपस्थित सर्वच भाविकांनी दिवसभर श्री मंगळग्रह देवांचा पाळणा हलवत दर्शनाचा पुण्यलाभ घेतला. त्यानंतर पुण्यातील वेंकीज कंपनीतर्फे भाविकांना मोतीचूर लाडूंचा प्रसाद वाटप सुरू झाले, ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहिले.

५६ फळांचा भोग
अमळनेर येथील निर्गुण फूल भांडारचे संचालक वाल्मीक पाटील यांनी श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह देवांना देशी-विदेशी ५६ फळांचा भोग अर्पण केला. यामध्ये आंबा, पपई, जांभूळ, केळी, कलिंगड, बोर, सफरचंद, खरबूज, चक्री लिंबू (ग्रेपफ्रूट), संत्री, चिकू, म्हाळुंग, मोसंबी, अननस, कागदी लिंबू, द्राक्ष, नारळ, लिंबू , पेरू, सीताफळ, फणस, डाळिंब, रामफळ, हनुमानफळ (ग्रॅव्हिओला), आवळा, पिस्ता, आटकी (शहतूत, तुती), करवंद, अंजीर (ड्राय), अळूचाळू (प्लम), चिंच, खजूर, आडू (पीच), अंजीर, स्ट्रॉबेरी, जर्दाळू (ॲप्रिकॉट), अळू, ब्ल्यूबेरी, चेरी, काजू (काजूबोफ्लड), रॅस्पबेरी, किवी, आक्रोड, ब्लॅकबेरी, ड्रॅगनफ्रूट, बदाम, क्रेनबेरी, पॅशनफ्रूट, एवोकॅडो, लिची, बेल (बेलफळ), स्टारफ्रूट (करमळ), मंगोस्टीन, कवळ, उंबर, शेवगा (रायआवळा) या देशी-विदेशी फळांचा समावेश होता. दरवर्षी विविध खाद्यपदार्थांचा देवाला ५६ भोगाचा नैवेद्य दिला जातो. मात्र, यावर्षी यासोबतच ५६ विविध फळांचाही नैवेद्य देण्याची सुप्रथा सुरू झाली.

देशी-विदेशी फुलांची मयूरपंखी मनमोहक सजावट
श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिराच्या ओट्यावर सजविण्यात आलेल्या पाळण्याच्या अवतीभोवती देशी-विदेशी फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. यात ऑर्किड, सन्स फ्लॉवर्स, जर्बिरा, गुलाब पिचकलर, टचगुलाब, चायनीज गुलाब, गॅलडो काडी सात प्रकारची, ३ प्रकारची शेवंती, निषिगंधा, जिप्सी, निलियम, लिली, कॅला लिली, झेंडू शेवंती, आस्टर, कामिनी, डिशनरी, सोफ्लगाफूल, कटपत्ता, सूर्यपत्ता, पामपत्ता, ट्यूलीप, नंदनवन पक्षी, डॅफोडिल्स, अंथरियम, चॉकलेट कॉसमॉस आदी फुलांच्या माध्यमातून करण्यात आलेली मयूरपंखी सजावट भाविकांचे आकर्षण बनली होती.

श्री मंगळ जन्मोत्सव लाइव्ह
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित सर्व धार्मिक विधींचे दिवसभर जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंगल तंत्रज्ञ आशिष चौधरी यांनी या धार्मिक विधींचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील भाविकांना घरी बसून थेट प्रक्षेपण घडविले. 


श्री महाभोमयाग, पालखी आणि महाधुपारती
दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचेही आयोजन करण्यात आले. श्री महाभोमयाग हा प्रामुख्याने श्री मंगळग्रह देवांच्या कृपेसाठी केला जाणारा हिंदू धर्मातील एक अतिशय परम पवित्र आणि शक्तिशाली याग मानला जातो. विशेष मानकरी मा. प्रा. चंद्रकांत सोनवणे (आमदार, चोपडा) व त्यांच्या धर्मपत्नी सौ. लताताई सोनवणे (माजी आमदार, चोपडा), मा. डॉ. उमाताई ढेकळे (तहसीलदार, अमळनेर), मा. श्री. प्रवीण नाना पाटील (बांधकाम व्यावसायिक, चाळीसगाव) व त्यांच्या धर्मपत्नी सौ. कविताताई पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव मा. श्री. सुरेश बाविस्कर व त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगलाताई बाविस्कर या यागात दुपारी साडेचार वाजेपर्यंत सक्रिय सहभागी राहिले. सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदासह वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची भव्य महाधुपारती होऊन या सोहळ्याची सांगता झाली.

----