लोक न्यूज
वैजापूर, ता. २८ : वैजापूर शहर व तालुक्यातून दररोज शेकडो नागरिक मुंबई, पुणे, पंढरपूर, मालेगाव, धुळे तसेच श्रीरामपूरमार्गे विविध शहरांकडे प्रवास करतात. मात्र या महत्त्वाच्या मार्गांवर वैजापूर एस.टी. आगारातून थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आगारातून लांब पल्ल्याच्या बससेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
याबाबत शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन शुक्रवारी (ता. २८) प्रवाशांनी वैजापूर एस.टी. आगाराचे प्रभारी डेपो मॅनेजर गोपाल पगारे यांच्याकडे सादर केले. यावेळी बंद करण्यात आलेली वैजापूर-पुणे बससेवा पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
प्रवासी संघटना सल्लागार व ज्येष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत आणि डॉ. संतोष गंगवाल यांनी प्रभारी डेपो मॅनेजर गोपाल पगारे यांना निवेदन दिले. तसेच हे निवेदन विभागीय नियंत्रक, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.
या मार्गांवर बससेवेची मागणी
निवेदनामध्ये वैजापूर–श्रीरामपूर–अहिल्यानगर–पुणे तसेच वैजापूर–मालेगाव–धुळे या मार्गांवर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी सुरू करण्यात आलेली वैजापूर–पंढरपूर बससेवाही पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
वैजापूरमधून या शहरांकडे मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना सध्या अन्य मार्गांचा आधार घ्यावा लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे.
"बसेस लगेच बंद करू नका"
नवीन बससेवा सुरू केल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद आणि उत्पन्न पाहण्यासाठी किमान एक-दोन महिने बस नियमितपणे चालविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. बस सुरू करून काही दिवसांतच कमी उत्पन्नाचे कारण देत सेवा बंद करू नये. प्रवाशांना या मार्गांची सवय होण्यासाठी आणि नियमित प्रवासीसंख्या वाढण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा, अशी भूमिका प्रवाशांनी मांडली.
वैजापूर आगारातून लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून एस.टी. महामंडळालाही चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन आवश्यक त्या मार्गांवर बससेवा सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.