लोक न्यूज
अमळनेर : शहरातील पाच पावली देवी मंदिरासमोर सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी उन्मळून पडलेले पिंपळाचे झाड अद्यापही जागेवरच पडून असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे याच परिसरात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही संबंधित यंत्रणेकडून हे झाड हटविण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
उन्मळून पडलेल्या झाडामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंदिराच्या परिसरात ये-जा करताना अडथळा निर्माण होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना विशेष गैरसोय होत आहे. तसेच परिसरातील वाहतूक आणि पादचारी मार्गावरही या झाडाचा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते, इतके दिवस उलटूनही संबंधित विभागाने झाड हटविण्याची जबाबदारी स्वीकारलेली दिसत नाही. त्यामुळे हे झाड हटविण्याची जबाबदारी महापालिकेची, सार्वजनिक बांधकाम विभागाची की प्रशासकीय इमारतीचे काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नवीन प्रशासकीय इमारतीचे काम वेगाने सुरू असताना मंदिरासमोरील उन्मळून पडलेल्या झाडाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तसेच भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने झाड हटवून परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.