लोक न्यूज
युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक 8 मधील संत सखाराम महाराज नगर ओपन प्लेस व साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ, रामबाग कॉलनी येथे विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) अंतर्गत इनोमरेशन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित या उपक्रमात सुमारे 500 नागरिकांनी फॉर्म भरून दिल्याने बीएलओंनी समाधान व्यक्त केले.
यावेळी अमळनेरचे प्रांत अधिकारी मयूर भंगाळे यांनी दोन्ही केंद्रांना भेट देऊन कामाची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, "इनोमरेशन फॉर्म भरला नाही तर मतदार यादीत नाव येणार नाही." महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष आणि सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मृत, स्थलांतरित व अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी प्रभाग क्रमांक 6, 7 व 8 मधील नागरिकांच्या घरोघरी माहितीपत्रके वितरित करून केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठानने केले होते. एकाच ठिकाणी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार तसेच बीएलओंचे आभार मानले.
या उपक्रमासाठी बीएलओ अजय भामरे, धर्मा धनगर, चिंतामण धनके, शिवाजी मोरे, दत्तू कोळी, विकास पाटील, ज्ञानेश्वर भदाणे आणि दिनेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले. यावेळी किरण शिसोदे, अशोक बिऱ्हाडे, पत्रकार संजय पाटील, मुन्ना पवार, मिलिंद मोरे, गोसावी आबा, आनंद पवार, सुनील बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांसाठी 26 जुलै 2026 रोजी संत सखाराम महाराज नगर ओपन प्लेस येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एसआयआर नोंदणीची सुविधा पुन्हा उपलब्ध राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी युवा कल्याण प्रतिष्ठान ही एकमेव संस्था असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.