मादक व नशिले पदार्थ व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त करून जीवनाची राख-रांगोळी करतात. त्यामुळे युवा पिढीने अशा व्यसनांपासून दूर राहून समाजात त्याविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.
मादक पदार्थ विरोधी जनजागृती दिनानिमित्त तंबाखूमुक्त पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी, युवक आणि पालकांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देऊन तंबाखू, गुटखा, मद्य तसेच सर्व प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन कायमचे सोडण्याचे आवाहन केले.
राजपूत यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे तर कुटुंबाची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक हानी होते. त्यामुळे प्रत्येकाने व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच इतरांनाही त्याचे दुष्परिणाम समजावून सांगून जनजागृती करावी, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका नीता पाटील, शिक्षक बी. बी. जाधव, वैशाली पगारे, ज्योती दिवेकर, राजश्री बंड, पालक, विद्यार्थी तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैजापूर, दि. २९ : लोक न्यूज