लोक न्यूज
वैजापूर, ता. २६ : वैजापूर येथील संतोष धोंडीरामसिंह राजपूत यांची कन्या युविका संतोष राजपूत हिने आयआयटी प्रवेश परीक्षेत (JEE Advanced) खुल्या प्रवर्गातून देशात १५वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची आसाम राज्यातील गोहाटी येथील शासकीय आयआयटी महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड झाली आहे. तसेच इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत तिने ८२ टक्के गुण मिळविले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य राजपूत-परदेशी विकास महासंघाच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात युविकाचा सन्मान करण्यात आला. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले आणि संभाजीनगरचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते तिला स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, समाजकार्यकर्ते, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोताराम बहुरे होते. महासंघाचे राज्याध्यक्ष विश्वनाथ नंदलाल राजपूत यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार प्रदीप जैस्वाल, संभाजीनगरचे एसीपी अशोकसिंह राजपूत, वैजापूरचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत आदींची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमास चत्तरसिंग महेर, ॲड. नरेंद्रसिंग शेवंगण, डॉ. गीताताई शेवंगण, भीमसिंग कहाटे, जिल्हाध्यक्ष फुलसिंह राजपूत, राजेंद्रसिंह राजपूत, कल्पनाताई राजपूत, रेखाताई काकरवाल, चंदा राजपूत, प्राचार्य गुरुदत्त राजपूत तसेच जिल्ह्यातील राजपूत-परदेशी समाजाचे विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युविका संतोष राजपूत या वैजापूरचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांच्या नात आहेत.