लोक न्यूज
अमळनेर : -तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शासकीय कापूस खरेदी (सीसीआय)केंद्राला अखेर मंजुरी मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले.
मागील वर्षी सदर केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनात्मक पवित्र देखील घेतला होता.कापूस महामंडळाने सीसीआय केंद्राच्या यादीत अमळनेरचे नाव समाविष्ट केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत आपल्या कापूस पेऱ्याची तसेच ' कपास किसान ' ऍप वर नोंदणी करावी असे आवाहनही बाजार समिती सभापती अशोक पाटील यांनी केले आहे.
गेल्यावर्षी अमळनेर तालुक्याला अनेक प्रयत्न करूनही सीसीआय केंद्र मिळाले नव्हते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल कमी भावाने विकावा लागला होता. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आणि प्रचंड नाराजी पसरली होती. काही शेतकऱ्यांना अमळनेर तालुक्याच्या जवळच्या केंद्रांवर जाऊन कापूस विकावा लागल्याने त्यांना वाहनांचे भाडे आणि तेथे थांबण्यास विलंब लागत असल्याने वेळ व पैसा यांचा भुर्दंड बसला होता.
यावर्षी सभापती अशोक पाटील यांनी सुरुवातीपासून सचिव उन्मेष राठोड यांच्याकडून आवश्यक तो प्रस्ताव तयार करून घेऊन खासदार श्रीमती स्मिता वाघ , आमदार अनिल पाटील यांचेही पत्र व मदतीने सुरुवातीपासून पाठपुरावा सुरू केला होता. कापूस पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना खरेदी क्षमता , कापूस प्रतवारी याबाबत सकारात्मक भूमिका पटवून देण्यात सभापती अशोक पाटील यशस्वी ठरले. कापूस महामंडळाचे वरिष्ठ वाणिज्य अधिकारी इंद्रप्रकाश लाटासर यांनी सहकार्य करत अमळनेर केंद्राचा ऑनलाइन यादीत समावेश केला आहे. लक्ष्मी जीन आणि लामा जीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करणार आहे. सीसीआय केंद्र मिळाल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा फायदा होईल. शासकीय भाव मिळाल्याने उत्पन्न मर्यादा वाढणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आता नोंदणीसाठी सेतू केंद्र किंवा कोणत्या दुकानावर जाण्याची गरज पडणार नाही.
आमदार अनिल पाटलांचा होता सतत पाठपुरावा
सीसीआय ची मंजुरी मिळावी यासाठी सतत एक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता मागील वर्षी जवळ जवळ केंद्र नको म्हणून मंजुरी मिळाली नाही,बाजार समिती सभापती व शेतकरी सतत आपल्या संपर्कात होते,सततच्या पाठपुराव्यामुळे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत यावर्षी मंजुरी मिळाल्याने शेतकरी बांधवाना दिलासा मिळाला आहे.
अनिल पाटील
आमदार,अमळनेर
ऑनलाइन नोंदणी करावी
शेतकऱ्यांनी ऑनलाइन पिकपेरा ,सातबारा उतारा , तसेच अपडेट आधारकार्ड आदी माहिती भरून 'कपास किसान' ऍप वर ३० सप्टेंबर पर्यंत नोंदणी न केल्यास त्या शेतकऱ्यांचा कापूस शासकीय भावात खरेदी केला जाणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून "कपास किसान" अँप डाऊनलोड करून शेतकरी स्वतःच स्वतः नोंदणी करू शकता.
-अशोक आधार पाटील , सभापती , कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर