अमळनेर - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा अध्यक्षपदी संदीप घोरपडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना कार्याध्यक्ष रमेश पवार व प्रा. श्याम पवार शेजारी कार्यकारणी सदस्य.
लोक न्यूज
अमळनेर - महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) च्या अमळनेर शाखा अध्यक्षपदी संदीप बाबुराव घोरपडे, कार्याध्यक्षपदी रमेश यशवंत पवार, प्रमुख कार्यवाह पदी दिनेश वसंतराव नाईक तर कोषाध्यक्षपदी उमेश प्रतापराव काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवृत्त उपप्राचार्य प्रा शाम पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ही नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
यावेळी उर्वरित कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मल्हारराव देशमुख, कार्यवाहपदी विजया राजेंद्र गायकवाड, तर सदस्यपदी नरेंद्र दिनकरराव निकुंभ, डॉ. रमेश नामदेव माने, दिलीप राजाराम सोनवणे, निरंजन रमेश पेंढारे, गोकुळ गोविंदा बागुल, शरद भिका पाटील, प्रा डॉ ज्ञानेश्वर मोहन मराठे, भारती संजय सोनवणे, सुनीता रत्नाकर पाटील यांचा समावेश आहे. मराठी वाडमय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, निवृत्त उपप्राचार्य प्रा. श्याम पवार, मुख्याध्यापक रणजीत शिंदे यांच्या समितीने कार्यकारणी सदस्यांच्या सहकार्याने ही निवड केली आहे. दरम्यान कार्यकारी मंडळाची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात नुकतीच संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात नवीन कार्यकारिणीचे स्वागत सत्कार करण्यात आला. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करत मार्च २०२५ ते जून २०२५ या कालावधीत झालेल्या जमा - खर्चास मंजुरी देण्यात आली, नवीन कार्यकारिणी सोबत विश्वस्त व नामनिर्देशित दोन सदस्यांची निवड करणेबाबत चर्चा करण्यात आली. स्थानिक दोन लेखकांच्या पुस्तकांचे वाचन व चर्चासत्र आयोजित करणे तसेच संस्थेच्या वतीने आगामी काळात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांची चर्चा करण्यात आली. राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटकाची निवड करून स्पर्धेमध्ये नाटक दाखल करणे कामी चर्चा करून मसाप पुणे येथील प्रस्ताव तयार करून पाठविणे बाबत चर्चा करण्यात आली. प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले.