लोक न्यूज

अमळनेर:- मुलांमध्ये वाढणाऱ्या साखरेशी संबंधित आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर, श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी शाळेला साखरमुक्त शाळा म्हणून घोषित करून असे करणारी पहिले शाळा ठरण्याचा मान मिळवला आहे.
     सध्या मोठ्या प्रमाणावर चॉकलेट्स, जेली, आणि गोड पदार्थ खाल्ल्यामुळे लहान वयातच मुलांना निरनिराळ्या व्याधी जडू लागल्या असून याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे बनले आहे. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलने घेतलेल्या या धाडसी आणि आरोग्यपूरक उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अत्यधिक साखर सेवनाचे दुष्परिणाम यांची जाणीव निर्माण करणे व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे हा आहे. या उपक्रमाचे महत्त्व ओळखून शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व नोटीस बोर्ड सर्जनशील व माहितीपूर्ण सजावट करून सजवले, ज्यामुळे संपूर्ण शाळेत या उपक्रमाचा संदेश पोहोचला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.

हा स्तुत्य उपक्रम सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून मनःपूर्वक अभिनंदनास पात्र ठरला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्याबाबतच्या बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे. समाजाने एकत्र येऊन सकारात्मक बदल घडवून आणल्याचा एक आदर्श नमुना म्हणून ही संकल्पना पुढे येते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, शाळेत विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट, केक किंवा फास्ट फूड वाटपावर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना शालेय ग्रंथालयासाठी पुस्तके, बागेसाठी रोपे किंवा घरी बनवलेले आरोग्यदायी अन्न आणण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया...
      साखरेच्या अतिसेवनामुळे अनेक लहान मुलांना डायबिटीस सारखे आजार बालवयात जडल्याचे लक्षात आल्याने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून या उपक्रमात विद्यार्थी व पालकांचा ही उत्तम सहभाग लाभत आहे.
        - श्री. एल. लक्ष्मण, प्रिन्सिपल, एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल