लोक न्यूज

अमळनेर-महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित "मंगल कलश रथयात्रेचे" उत्तर महाराष्ट्रातील भव्य शुभारंभाच्या काल दुसऱ्या दिवशी अमळनेर येथे  जल्लोषात स्वागत करण्यात आले.
       आ.अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पु साने गुरुजी आणि श्रीमंत प्रतापशेठजी यांच्या पावन कर्मभूमीत, सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिर व श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या पवित्र भूमीवरून  रथयात्रा मार्गस्थ झाली.या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत झाले.या ऐतिहासिक रथयात्रेमुळे पक्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बांधिलकीचे जिवंत दर्शन घडत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध आणि तेजस्वी संस्कृतीचा गौरव उंचावण्याचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा वसा घेऊन ही यात्रा पुढे सरसावली. या शुभप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील साहेब,राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार  यांची विशेष उपस्थिती होती.
     सदर रथयात्रा अमळनेरहून गलवाडे, झाडी, भरवस, एकलहरे,बाम्हणे फाटा मार्गे धुळे जिल्ह्यात प्रवेश केला. तेथून बेटावद (ता. शिंदखेडा) ,नरडाणा, शिंदखेडा शहर,विरदेल, धमांणे, बाम्हणे (शिंदखेडा), दोंडाईचा शहर आणि निमगुळ मार्गे सारंगखेडा येथे पोहोचली. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करून प्रकाशा आणि नंदुरबार शहरात आगमन झाले.
       नंदुरबारमध्ये शाहिद शिरीषकुमार यांच्या स्मारकाला अभिवादन करून यात्रा दोंडाईचा मार्गे चिमठाणे हून धुळे शहरात मुक्कामास दाखल झाली.
       ही रथयात्रा केवळ धार्मिक वा राजकीय मर्यादेत न अडकता, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारी आणि जनतेशी आपुलकीने संवाद साधणारी आहे. उत्तर महाराष्ट्रात संघटन बळ वाढवून, सामाजिक सलोख्याचा नवा अध्याय लिहीत, जनतेत नवचैतन्य निर्माण करण्याचा आम्हाला ठाम विश्वास असल्याची भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेली महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचे स्वागत अमळनेर अर्बन बँकेच्यावतीने पु.सानेगुरुजी पुतळ्याजवळ करण्यात आले. यावेळी बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे, संचालक मोहन सातपुते अभिषेक पाटील यांनी मंगल कलश यात्रेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व बँकेच्या उपस्थित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगल कलश यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.