लोक न्यूज-
सोलापूर : जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हे ब्रीद घेऊन गुरुवार (ता. 4) पासून  सलग तीन दिवस दररोज सायंकाळी सात वाजता  पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात 'पांडुरंगी' या संगीतमय संत चरित्र दर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, वैभवीश्री यांनी दिली.

प्रख्यात प्रवचनकार वैभवीश्री यांचा नुकताच विजयपूर रोड, सोलापूर येथे सत्संग झाला. या सत्संगाच्या समारोपानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. वैभवीश्री यांच्या सानिध्यात व आळंदी येथील समस्त साधक बालकांनी सादर केलेली संगीतमय कलाकृती 'पांडुरंगी ' ही संत चरित्र दर्शन घडविणारी कलाकृती आहे. संतांचे चरित्र प्रत्यक्ष नाट्यकृतीतून पाहण्याची संधी पंढरपूरकरांना  उपलब्ध होत आहे.
 याबद्दल अधिक माहिती देताना वैभवी श्री म्हणाल्या, उत्तर भारतामध्ये कृष्णचरित्रावर अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. कृष्णचरित्र मोठ्या प्रमाणात संगीतमय नाट्यकृतीतून सादर केले जाते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील संतांचा परिचय भाविकांना व्हावा, यासाठी संतांचे चरित्र संगीत व नाट्य स्वरूपात सादर केले जाणार आहे. गुरुवार ता. 4 मे रोजी जनाबाई चरित्र, 5 मे रोजी सखुबाई चरित्र, 6 मे रोजी संत भानुदास चरित्र सादर करण्यात येणार आहे. विठ्ठल मंदिरातील सभा मंडपात दररोज सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे, भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  वैभवीश्री यांनी केले आहे.