लोक न्यूज-
नरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील विटाई गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन ९१ जणांवर नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हाणामारीत काही जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.

यासंदर्भात, विटाई येथील पुष्पा पवार व त्यांचे पती अशोक पवार हे गावातील पाण्याच्या हाळ जवळील मुतारी कोणत्याही प्रकारची बैठक न घेता पाडून टाकली असल्याची आपसात चर्चा करीत होत. मात्र, घराशेजारी राहणारा विशाल रवींद्र खैरनार याने ते त्याच्याविषयी बोलत असल्याचा संशय येऊन वाद घालून भांडण केले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तसेच विशालने विनोद अशोक पवार याच्या गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची साखळी जबरीने काढून घेतली. याप्रकरणी पुष्पा पवार

यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ५० जणांविरुध्द भादंवि कलम ३२७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परस्परविरोधात विशाल रवींद्र खैरनार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अशोक रतन पवार याने मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण केली. विशालच्या गळ्यातील २५ ग्रॅमची सोनसाखळी जबरीने ओढून घेतली. यावरुन ४९ जणांविरुध्द भादंवि कलम ३२७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत एकूण १४ जणांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.